
मुंबई : राज्यात पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत २५ आणि २६ नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पुढील ४८ तासांत मुंबई, ठाणेसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं चित्र पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिना जवळजवळ संपत आला असला, तरी थंडी मात्र वाढलेली नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील चक्रीवादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल. त्यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.