वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे मुंबई महापालिकेचे विविध प्रकारच्या माध्यमातून प्रयत्न चाललेले असताना आता त्यावर आणखी प्रभावी उपाय म्हणून मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरे म्हणजे असे केल्याने प्रदूषण थांबणार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. उलट त्यामुळे पैशांचा चुराडाच अधिक होईल. एरव्ही मुंबईत पावसाळ्याच्या दिवसांत चार महिने भरपूर पाऊस पडत असतोच. त्याने प्रदूषण थांबत नाही, तर आता कृत्रिम पाऊस पाडल्याने हे प्रदूषण थांबणार आहे का? हा प्रश्न आहे. याबाबत शासनाने प्रदूषण तज्ज्ञांचे मत जाणून घेतले आहे काय? तसे असेल आणि महापालिकेचा पैसा वाया जाणार नाही, हेही तपासून पाहिले पाहिजे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी देशातील गोरगरिबांचे मुंबई शहर जगण्याचे ठिकाण आहे. केवळ गरीबच नव्हे तर चाकरमानी, विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक यांचेही मुंबई शहराशी नजीकचे नाते आणि त्यांचे व्यवहार अवलंबून असल्यामुळे मुंबईशिवाय ते राहू शकत नाहीत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई शहरावर विविध बाबतीत ताण आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत, इमारती बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेने वॉर्डस्तरावर करण्यास सुरुवात केली आहे. वॉर्डस्तरावर नेमण्यात आलेल्या विशेष पथकांकडून पाहणी होत असून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास काम थांबविणे किंवा ते सील करण्यात येणार आहे.
असो. दिल्लीपाठोपाठ मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले, यात शंकाच नाही. मुंबईत आधीच लाखोंच्या संख्येने वाहने आहेत. शिवाय बाहेरून येणारी वाहने काही कमी होत नाहीत. या वाहनांमुळेही वातावरणातील हवेत प्रदूषणाचा फैलाव होत असावा, असे वाटते. वास्तविक मुंबईत विविध प्रकारच्या माध्यमातून जे प्रदूषण निर्माण होत आहे, ते थांबवणे हे महापालिकेसमोर आणि राज्य सरकारसमोर मोठे आव्हात्मक काम आहे. मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. त्यात रस्ते, पदपथ आणि धूळ आदी कामांची पाहणी केली. यामधून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रसंगी दुबईतील कंपनीशी करार करून कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच एका दिवसाआड म्हणजेच तिसऱ्या दिवशी मुंबईतील रस्ते धुऊन साफ केले जातील. त्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घ्यावे लागतील, असेही त्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री जे काही म्हणत आहेत ते मुंबईकरांच्या दृष्टीने आणि मुंबईच्या आरोग्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. हे सर्व असताना मुंबईत जी विकासकामे सुरू आहेत, जसे मोठ्या इमारतींची कामे, इमारतींचे पाडकाम, मेट्रो रेल्वेची कामे व अन्य प्रकारच्या कामामुळे जी धूळ निर्माण होते, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण आणि लाखो वाहनांच्या धूर आणि धुळीच्या कणांमुळे निर्माण होणारे प्रदूषण या सगळ्यांचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम किती घातक आहे, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. धूळ प्रतिबंधक उपाय करण्याची गरज तर आहेच, यात दुमत असण्याचे कारण नाही. प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे. लोकांनीही आपापल्या पद्धतीने काळजी घेण्याची गरज तर आहेच. शिवाय महानगरपालिकेचे कर्मचारी येतील आणि स्वच्छता करतील, असे त्यांच्या भरवशावर न बसता आपला परिसर कसा स्वच्छ राहील, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई महापालिका सर्व बागांमध्ये अधिकची झाडे लावणार आहे. नव्हे त्याची अधिक गरज आहे. या झाडांमुळे धुळीचे कण रोखता येतील, शिवाय कार्बन डायऑक्साईड अधिक निर्माण करण्याचे काम ही झाडे करतील.
प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे, त्यासाठी विविध उपाय योजत आहे. रस्ते पाण्यामुळे साफ केल्यास धुळीचे कण उडणार नाहीत. हे सर्व असताना महापालिकेला मोठ्या खर्चाची तरतूद करावी लागणार आहे. मग त्यासाठी रस्ते धुण्यासाठी लागणारे टँकर, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी होणारा खर्च सोसावा लागणार आहे. त्याचबरोबरीने आता मुंबईकरांनी प्रदूषण दूर व्हावे यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.