जाणून घ्या कोणत्या गाड्यांमध्ये होणार बदल
पुणे : पुणे शहर परिसरातील रेल्वे (Pune Railway Block) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये उद्या शनिवारी, २५ नोव्हेंबर आणि रविवारी २६ नोव्हेंबरला रेल्वेमहामार्गावर विशेष मेगा ब्लॉक राहणार आहे. पुणे मार्गावरील खडकी ते शिवाजीनगर दरम्यान २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत नॉन इंटरलॉकिंगचे काम, मिलिटरी यार्डचे इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात (Timetable) बदल करण्यात आला आहे.
मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत, काही गाड्यांची वेळ बदलली आहे, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रवाशांनी झालेल्या गैरसोयीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कृपया रेल्वे चौकशी यंत्रणेवर गाडीची सद्यस्थिती तपासून पहावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मेगाब्लॉक काळात पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन (Deccan Queen), सिंहगड एक्स्प्रेस (Sinhagad Express), इंटरसिटी (Intercity), कोयना (Koyna), डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहींच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.