२७ नोव्हेंबरला दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार घोषणा
मुंबई : भारतीय साहित्य (Indian Literature) क्षेत्रातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ (Jnanpith Award) पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या कोसला (Kosala) कादंबरीचे अनेक चाहते आहेत. पुण्यात शिक्षणासाठी एका छोट्याशा गावातून आलेल्या पांडुरंग सागवीकर या नायकाची द्विधा मनस्थिती दर्शवणारी ही कादंबरी. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे.
भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लिहिलेल्या या कादंबरीतून समाजाचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. अनेक वर्षे लोटली तरीही मराठी साहित्यविश्वात कोसला कादंबरीची चर्चा होते. अशातच कोसला कादंबरीसंबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर आता मराठी सिनेमा (Marathi Movie) येणार आहे. ‘कोसला – उदाहरणार्थ मी’ असं या सिनेमाचं नाव आहे. निर्माण स्टुडिओज आणि मेहूल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
२७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मुंबईत ही घोषणा होणार आहे. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, अच्युत पालव या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा होणार आहे. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच सिनेमाची संपूर्ण टीम आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. नेमाडेंच्या लोकप्रिय कोसला कादंबरीवर सिनेमा येणार असल्याने पुस्तकप्रेमी आणि सिनेप्रेमी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.