मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत(mumbai) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या(airport) टर्मिनल २ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी गुरूवारी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. यात ४८ तासांच्या आत बिटकॉईनच्या रूपात १० लाख डॉलरची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ आणि ५०५(१)(ब) अंतर्गत केस दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की मेलच्या आधारावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार [email protected] नावाच्या आयडीने हा धमकीचा मेसेज मिळाला. पोलिसांनी पुढे सांगितले की आरोपीने हा इमेल गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये पाठवला आहे.
काय लिहिले होते ईमेलमध्ये?
धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते की, विषय – ब्लास्ट. ही तुमच्या विमानतळासाठी शेवटची सूचना आहे. जर बिटकॉईनमध्ये १० लाख डॉलर पत्त्यावर ट्रान्सफर केले नाही तर आम्ही ४८ तासांच्या आत टर्मिनल २चा विस्फोट करून उडवून देऊ. आणखी एक अलर्ट २४ तासांनंतर पाठवण्यात येईल.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहता विमानतळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच धमकीचा ईमेल ज्या आयपी अॅड्रेसने पाठवण्यात आला आहे त्याचीही माहिती मिळवण्यात आली आहे.