Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीअभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त

अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त

मुंबई : राज्यातील सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाला १२ महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहे. संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचं आरबीआयने सांगितले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रशासकांच्या मदतीसाठी असलेल्या सल्लागार समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश आहे.

या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर निम्न-मध्यमवर्गीयांची खाती आहेत. बँकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेकडे 17.30 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रु. 10,838 कोटी आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 12.60 टक्के होते. बँकेच्या संकेतस्थळावर 2020 नंतरची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.

दरम्यान, आरबीआयकडून बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासकामुळे बँकेच्या कामाकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -