लेखी तक्रार करताच पालिका आयुक्तांनी अनिल गलगलींना पाठवला अहवाल
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविडच्या ४,१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी तपशीलवार जाहीर झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दस्तुरखुद्द पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी खर्च करण्यात आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. पण कोणत्याही विभागाने माहिती दिली नाही. याबाबत लेखी तक्रार करताच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अनिल गलगली यांस ३ पानाची तपशीलवार माहिती दिली. ही आकडेवारी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची आहे.
यात अन्नाची पाकिटे आणि अन्नधान्य यावर 123.88 कोटी, मध्यवर्ती खरेदी विभागाने 263.77 कोटी, वाहतुक विभागाने 120.63 कोटी, यांत्रिक आणि विद्युत विभागाने 376.71 कोटी, घन आणि कचरा विभागाने 6.85 कोटी खर्च करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी यांनीफक्त 9 लाखांचा निधी दिला आहे.
जंबो सुविधा केंद्रावर सर्वाधिक खर्च
मुंबईतील 13 जंबो सुविधा केंद्रावर 1466.13 कोटी खर्च करण्यात आले आहे. यानंतर मुंबईतील 24 वॉर्ड आणि सेव्हन हिल रुग्णालयाने 1245.25 कोटी खर्च केला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाने 233.10 कोटी खर्च केले आहे. मुंबईतील 5 प्रमुख रुग्णालयाने 197.07 कोटी, 6 विशेष रुग्णालयाने 25.23 कोटी, 17 पेरिफेरल रुग्णालयाने 89.70 कोटी आणि नायर रुग्णालयाने 1.48 कोटी खर्च केले आहे.
अनिल गलगली यांच्या मते ही आकडेवारी जरी स्पष्ट असली तरी कोविड काळातील सर्व प्रकारच्या खर्चावर श्वेत पत्रिका काढली जाणे आवश्यक आहे जेणेकरून अजून सुस्पष्टता येईल.