Sant Dnyaneshwar : शांतिदेव ज्ञानदेव


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायात ज्ञानदेवांनी सत्पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत. यातील एक लक्षण म्हणजे अहिंसा. ज्ञानी माणसाच्या मनात मुरलेल्या या अहिंसेचं वर्णन ज्ञानदेव करतात. त्या वर्णनाला तुलना नाही, तोड नाही. ते इतकं अभिनव, सुंदर आहे. मग मनात नवा अंकुर उमलू लागतो शांतीचा...



वतालच्या बातम्यांनी मन खिन्न होतं. कोणत्या बातम्या? युद्ध, मृत्यू, खून, दंगल… हिंसेचं हे भयानक तांडव बघून वाटतं, केव्हा आणि कधी थांबणार हे? ही ढवळून आणि डहुळून टाकणारी परिस्थिती! या हिंसाचाराचं मूळ जितकं समाजात आहे, तसंच ते माणसाच्या मनात आहे. मानवाच्या मनातील करुणा जागेल, तर ही हिंसा कमी होईल. म्हणूनच आज महत्त्व आहे शांती आणि करुणा यांचा संदेश देणाऱ्या साहित्याचं! कळत नकळत हा संस्कार करणाऱ्या साहित्याचं! ‘ज्ञानेश्वरी’तून या विचारांची शिकवण माऊली देतात, म्हणून तर ते अखिल जगताचे ‘माऊली’ आहेत.



‘ज्ञानेश्वरी’तील तेराव्या अध्यायात सांगितली आहेत सत्पुरुषांची लक्षणं! यातील एक लक्षण म्हणजे ‘अहिंसा’. ज्ञानी माणसाच्या मनात मुरलेली ही अहिंसा! याचं वर्णन ज्ञानदेव करतात. त्या वर्णनाला तुलना नाही, तोड नाही. ते इतकं अभिनव, सुंदर आहे!



आता ऐकूया या अहिंसक माणसाचं वर्तन! ‘स्वतः श्वासोच्छ्वास करायचा तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा बेताने तो हळू टाकतो आणि त्याचा चेहरा पाहिला असता केवळ प्रेमाचं माहेरघर असा दिसतो. तसेच त्याचे दात मधुरतेला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसतात.’ ती ओवी अशी -
स्वये श्वसणेंचि तें सुकुमार।
मुख मोहाचें माहेर।
माधुर्या जाहले अंकुर। दशन तैसे।
ओवी क्र. २६२



‘मोहाचे’ या शब्दाचा अर्थ आहे ‘प्रेमाचे’, तर ‘दशन’चा अर्थ आहे दात.
सुकुमार, माहेर आणि अंकुर! ऐकत राहावी अशी ही शब्दांतील, अर्थातील नाजुकता!
अ, स, म या सर्व अक्षरांत हळुवारपण आहे. ही खास अक्षर-योजना कशासाठी? कारण सांगायचा विषय आहे ‘अहिंसा’. म्हणून माऊली मृदू शब्दयोजना करतात. ही मृदुता अक्षर निवडीत आहे, तशीच ती वर्णनातही आहे.



‘त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडायच्या आधीच तोंडावर स्नेहभाव दृष्टीस पडू लागतो आणि पोटात अगोदर दया उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द बाहेर पडतात.’ ओवी क्र. २६३.



‘अंगी अहिंसा बाणलेला माणूस श्वास घेतो, तोही शेजारच्या माणसाला त्रास न होता. चेहऱ्यावर प्रेमभाव भरलेला!’



काय वर्णन करतात ज्ञानदेव! ‘मुख मोहाचे माहेर’! अहाहा! मनाला किती स्पर्श करते ही कल्पना! पुढे वर्णन येतं ‘माधुर्याला फुटलेले अंकुर म्हणजे दात’! ‘अंकुर’ या शब्दाने आपल्याला रोपाचा कोवळा कोंब आठवतो. ज्ञानदेव इथे ‘मधुरतेचा अंकुर’ म्हणतात. अहिंसक माणसाच्या ठिकाणी असलेली कोवळीक जाणवून देतात.



अशा व्यक्तीचं बोलणं कसं असतं? ‘ज्ञानेश्वरी’त येतं ‘मधुर नाद हा मूर्तिमंत पुढे उभा राहिला आहे, अथवा स्वच्छ गंगोदक उसळले आहे किंवा पतिव्रता स्त्रीला वृद्धपण प्राप्त झाले आहे.’ ओवी क्र. २६९.
‘त्याप्रमाणे खरे आणि मऊ, मोजके आणि प्रेमळ असे अमृताच्या लाटांप्रमाणे त्याच्या तोंडातून शब्द निघतात.’



‘कां नादब्रह्मचि मुसे आलें।
कीं गंगापय उसळलें।
पतिव्रते आलें। वार्धक्य जैसें’॥
ओवी क्र. २६९



‘तैसे साच आणि मवाळ।
मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे’॥
ओवी क्र. २७०



यात पतिव्रतेचा दाखलाही किती आगळा आणि अर्थपूर्ण! वृद्ध स्त्री अनुभवाने परिपक्व, प्रगल्भ झालेली असते. पुन्हा ती पतिव्रता, म्हणजे पवित्रतेचं तेज असलेली! सत्पुरुषाच्या शब्दांच्या ठिकाणी असं पावित्र्य, तेज, प्रगल्भता असते हे यातून सुचवलेलं आहे. हे वर्णन केवळ वर्णन राहात नाही, ‘ज्ञानेश्वरी’तून ते आपल्याही मनात झिरपत राहातं. मग मनात नवा अंकुर उमलू लागतो शांतीचा, शिवाचा, ज्ञानाचा... जगण्याला आयाम मिळू लागतो विश्वबंधुत्वाचा!
ॐ शांतीऽऽऽ॥



(manisharaorane196@gmail.com)


Comments
Add Comment

कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील

आज आहे लक्ष्मीपूजन: धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचे स्वागत!

मुंबई : लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य

दिवाळीचा आठवडा: 'या' ५ राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा! धनलाभाचे योग

मुंबई : दिवाळीच्या प्रकाशाने केवळ घरेच नव्हे, तर अनेकांचे नशीबही उजळून निघणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार,

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

आज धनत्रयोदशी, लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त 'हे' दोन तास अत्यंत महत्वाचे

अश्विन कृष्ण त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी आज साजरी होत आहे. पंचांगानुसार, त्रयोदशी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल आणि

वसुबारस २०२५; तिथी, पूजा विधी, कालावधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

हिंदू धर्मातील वसुबारस या सणाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांत हा सण