मुंबई : भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज पहाटे ३.४० मिनिटांनी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७.२० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. या इमारतीत मिल कामगार आणि संक्रमण शिबिरातील रहिवासी राहतात.
अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. पहाटे सर्वजण साखर झोपेत असताना ही आग लागल्याने धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण इमारतीत धूर पसरला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील १३५ जणांपैकी २५ जणांना इमारतीच्या टेरेसवरून, ३० जणांना १५ व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि ८० जणांना २२व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढले.