Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : धन्य ते संत सज्जन। भक्त त्यांचे निर्वाण॥

Gajanan Maharaj : धन्य ते संत सज्जन। भक्त त्यांचे निर्वाण॥

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

शेगाव येथील मठात साळू बाई नावाची एक महाराजांवर निष्ठा असणारी स्त्री भक्त होती. तिला एक दिवस महाराज म्हणाले, “डाळ पीठ घेऊन अहोरात्र स्वयंपाक करून जे कोणी मठात येतील त्या सर्वांना भोजन घालत जा. यामुळे तू नारायणाला प्रिय होशील.” तिने देखील हे महाराजांचे वाचन मानले आणि अनेक वर्षे मठामध्ये स्वयंपाकाची व भिजणं व्यवस्थेची सेवा केली.

खामगावजवळ जलंब नावाचे एक गाव आहे. त्या गावात तुळशीराम नावाचा एक सद्गृहस्थ राहात असे. याचा आत्माराम नावाचा सद्गुणी आणि तैलबुद्धी पुत्र होता. त्याला वेदध्यायन करण्याची आवड होती. म्हणून हा वाराणसी येथे वेद अध्ययन शिकण्याकरिता गेला. त्या ठिकाणी नित्य भागीरथी नदीत जाऊन स्नान करावे, माधुकरी मागून अन्न सेवन करावे आणि गुरुगृही जाऊन वेद अध्ययन करावे, असा त्याचा परिपाठ होता.

हा आत्माराम अभ्यास पूर्ण करून पुनश्च शेगाव येथे आला. अत्यंत आनंदाने श्री महाराजांचे दर्शन घेण्याकरिता मठात आला. आत्माराम महाराजांच्या सन्निध बसून वेद म्हणत असे. त्यावेळी काही चूक झाली, तर ती चूक स्वतः श्री गजानन महाराज दुरुस्त करीत असत. दासगणू महाराज आत्मरामाबद्दल म्हणतात,
तो वेद विद्येचा जाणता।
गजानन केवळ ज्ञान सविता।
आत्माराम वेद म्हणता।
कोठे कोठे चुकतसे।
त्या चुकीची दुरुस्ती।
करू लागले सद्गुरूमूर्ती।
आत्मारामाचे संगती।
वेद म्हणती महाराज॥
ऐकता त्यांचे वेदाध्ययन।
तन्मय होती विद्वान।
ने होय सराफावाचून।
किंमत त्या हिऱ्याची॥

पुढे आत्माराम आदरयुक्त अंतःकरणाने श्री महाराजांसोबतच राहिला. नित्य तो सेवेकरिता जलंब गावाहून शेगाव येथे येत असे. सेवेचा एकही दिवस त्याने चुकविला नाही. असा हा महाराजांचा एकनिष्ठ भक्त होता आत्माराम.

समर्थांच्या समधीनंतरही मठामध्ये समाधीची नित्य पूजा-अर्चा आत्मारामच करीत होता. या सेवेचा कोणताही मोबदला आत्मारामाने कधीही घेतला नाही. उलटपक्षी त्याने आपले घरदार आणि जी काही थोडीफार संपत्ती होती ती सर्व संपत्ती महाराजांच्या चरणी अर्पण केली. येथे संपत्तीच्या मूल्यांकनापेक्षा आत्मरामाच्या भक्ती-भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. आत्मारामाप्रमाणेच महाराजांवर श्रद्धा, भक्ती, निष्ठा आणि प्रेम असणारे अजूनही काही भक्त होते. त्यामध्ये स्वामी दत्तात्रय केदार दुसरे नारायण जामकर आणि एक भक्त जे केवळ दुधाहारी होते म्हणून त्यांना दुधाहारी बुवा असे म्हणत. या सर्वांची भक्ती अत्यंत उच्च कोटीची होती. इतकी की त्यांनी आपले तन मनच काय, सर्वस्व समर्थ चरणी अर्पण केले होते.

धन्य ते संत सज्जन। भक्त त्यांचे निर्वाण।

क्रमश:

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -