Sunday, May 11, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Wamanrao Pai : अज्ञानातून ज्ञानाकडे...

Wamanrao Pai : अज्ञानातून ज्ञानाकडे...

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै



पैसे मिळवण्यावर तुमचे सुख अवलंबून नाही. सुख मिळणे व सोयी मिळणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. Comforts of life सुखसोयी मिळवण्यासाठी, शरीराच्या सोयी होण्यासाठी पैसा आवश्यक आहे. सुख हे पैशांवर अवलंबून नाही. विज्ञानाने सर्व सोयी दिल्या म्हणून विज्ञानसुद्धा श्रेष्ठ आहे. पण माणसाला सुखी करण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही. विज्ञान काय करू शकेल? माणसाला जास्तीत जास्त सोयी करून देईल. माणूस मोटारीत बसतो व मोटार चालू होते. आता, तर मोटारीसुद्धा चालूबंद बटण दाबले की होतात. विज्ञानाने केलेले पराक्रम हे देदीप्यमान आहेत याबद्दल वाद नाही, तरीसुद्धा विज्ञान माणसाला सुख देण्यास समर्थ नाही. विज्ञान पाहिजेच पण त्याच्या जोडीला प्रज्ञान पाहिजे. अज्ञान मुळीच नको. अज्ञानातून सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. दारू पिणे, गुटखा खाणे या सर्व गोष्टी अज्ञानातून निर्माण होतात. आम्ही जेव्हा लोकांना सांगतो, तेव्हा लोक दारू सोडतात. आमच्याकडे एक कामवाली येते. ती नवीन लागली तेव्हा तिला कुणीतरी सांगितलं की, “तू ज्यांच्याकडे कामाला जातेस तिथे संत राहतात, सद्गुरू राहतात.” घरात असताना मी घरच्या कपड्यांवर असतो, तेव्हा तिला कळलेच नाही की इथे कोण संत आहेत. शेवटी तिला कुणीतरी सांगितले की, “अगं सद्गुरू सद्गुरू म्हणतात ते हेच.” तेव्हा ती मला म्हणाली, “महाराज माझा नवरा दारू पितो.” मी तिला म्हटले “तू त्याला माझ्या घरी घेऊन ये.” तिने त्याला आणले व तो आलाही. त्याची काहीतरी पुण्याई असावी. मी त्याला अर्धापाऊण तास मार्गदर्शन केले, समजावून सांगितले. त्याने त्या दिवसापासून दारू सोडली. तिने नंतर काही दिवसांतच आम्हाला सांगितले की, “तिचे दागिनेही त्याने सोडवून आणले. आता घरी आनंदी-आनंद आहे.”



हे मी का सांगतो आहे. लोक अज्ञानात असतात. लोक संगतीने दारू पितात असे आपण म्हणतो. पण संगत कुणाची धरायची याचे सुद्धा ज्ञान असावे लागते. सांगायचा मुद्दा अज्ञान, विज्ञान व प्रज्ञान यांत अज्ञान टाकाऊ, विज्ञान श्रेष्ठ आहे, चांगले आहे, आवश्यक आहे पण ते माणसाला सुख देऊ शकत नाही. उलट वेळ आली, तर दुःखच देते. एक लढाई झाली, तर कुणी जिंकणार नाही व कुणी हरणार नाही. माणूस विज्ञानाच्या बळावर विनाशाकडे जाऊ शकतो व विज्ञानाच्या बळावर सोयी मिळवू शकतो. प्रज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की, ते तुम्हाला सुख देऊ शकते म्हणूनच ज्ञान हाच देव. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान “पाहावे आपणासी आपण या नांव ज्ञान” असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. प्रज्ञान म्हणजे प्रभूचे ज्ञान. हा प्रभू आहे कुठे?



शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलू सकळ।



हा आपल्या हृदयांत आहे व तो आपल्याला कळतो. पण तो आपल्याला कळतो, हे सुद्धा आपल्याला कळत नाही.

Comments
Add Comment