नेवासे नगरीतून मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
शनिशिंगणापुर : ‘मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहायला लावू नका. छगन भुजबळ यांना वेळीच आवरा. नाही तर परिणाम गंभीर होतील’, असा गर्भित इशारा सकल मराठा समाज आरक्षण नेते मनोज जरांगे – पाटील यांनी सरकारला दिला. ते नेवासा येथील गणपती चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
सरकारने आरक्षणाची गंभीर दखल घेऊन ७० वर्षांपासून लपवून ठेवलेले आमचे आरक्षण आम्हाला परत करावे व न्याय देण्याचे आवाहन त्यांनी नेवासाचे पुण्यभूमीतून केले.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की,आरक्षण मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे. आरक्षण मिळू नये म्हणून मूठभर स्वयंघोषित पुढारी विरोध करीत आहेत. परंतु आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही अविचारी कृती करू नका. छगन भुजबळ यांनी गोणी भरून कांदे खावेत. जेलमध्ये त्यांना जास्तीचे कांदे मिळाल्यामुळे त्यांचे कंदाप्रेम वाढले असे दिसून येते’,अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
बुधवार रात्रीची श्रीरामपूरची सभा आटोपून गुरूवारी सकाळी जरांगे नेवासाकडे प्रयाण करीत असतांना नेवासा तालुक्यातील पाचेगाव,बेलपिंपळगाव फाट्यावर जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर पुनतगाव फाट्यावर ग्रामस्थांनी एक टन वजनाचा फुलांचा हार जेसीबीच्या साहाय्याने घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
हजारो मोटरसायकल स्वारांचा ताफा त्यांच्याबरोबर सामील झाला होता. संत ज्ञानेश्वर मंदिरात त्यांनी पैस खांबाचे मनोभावे दर्शन घेतले.
व्यासपीठाच्या ठिकाणी मनोज जरांगे यांना सुवासिनींनी ओवाळून त्यांचे स्वागत केले. जिजाऊ नितीन पटारे या चिमुकलीने औक्षण केले. व्यासपीठावरील छत्रपतींच्या भव्य पुतळ्याला जरांगे – पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली.
तत्पूर्वी नेवासा तालुका सकल मराठा समाजाचे वतीने अॅड. के.एच.वाखुरे यांनी छगन भुजबळ यांनी अंबड येथे खालच्या पातळीवरून केलेल्या भाषणाच्या निषेधाचा ठराव मांडला व त्याला उपस्थित जनासामुदायाने हात उंचावून पाठिंबा दिला. प्रास्ताविक भाऊसाहेब वाघ यांनी केले.
नेवासा येथे झालेल्या आमरण उपोषणाला मुस्लिमांसहित सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला.