Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसावधान! कोकणचा हापूस होतोय बदनाम...!

सावधान! कोकणचा हापूस होतोय बदनाम…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी कोकणातील देवगड हापूस इंग्लंडच्या राजघराण्यात जातो, असं म्हटलं जायचे. इंग्लंडच्या राणीला देवगडच्या हापूस आंब्याची भुरळ आहे, असेही म्हटलं जायचे. देवगडच्या हापूस आंब्याचा विशिष्ट रंग, त्याचा स्वाद हा जगावेगळाच आहे. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस या हापूस आंब्यातील ब्रॅण्ड झाला आहे. कोकणच्या किनारपट्टीवरील भागात आमराईतून तयार होणारे आंबे हे अधिक स्वादिष्ट असतात. या आमराईचाही एक बेल्ट असतो. त्यामध्ये असणाऱ्या आंबा बागेतून समुद्राच्या खाऱ्या हवामानावर बहरलेली बाग, त्या बागेतील आंबा स्वादिष्ट म्हटला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये ऋतुचक्र सतत बदलत राहाते. या बदलत्या ऋतुचक्रात आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या सर्वच फळपिकांच्या बाबतीत नुकसान होत आहे. या सर्वच फळांवर हवामानाने फार विपरित परिणाम होत आहेत. एकीकडे ऋतुचक्राने होत असलेले बदल, त्याचे परिणाम आणि दुसरीकडे सर्वच बाबतीत होणारी जीवघेणी स्पर्धा, या स्पर्धेत आपला ब्रँड टिकवून ठेवायचा असेल तर कोकणातील सर्वच शेती, बागायतदार शेतकऱ्यांनी अधिक सजग होणे आवश्यक आहे.

आजच्या बाजारपेठांमध्ये विविध जातीचा बारमाही आंबा बाजारात विक्रीला दिसतो. कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा फक्त काही विशिष्ट महिन्यांमध्ये आंबा हंगाम चालतो. त्याच तीन महिन्यांत आंबा उपलब्ध असतो. खरंतर फार पूर्वीपासून पावसाळ्यात म्हणजे आंबा, फणस यावर पावसाचे पाणी पडलं की, त्याची चव बदलते. जांभुळ, करवंद तर झाडांवरही दिसत नाहीत; परंतु एकीकडे आपल्याकडच्या हापूस आंब्याला पावसाळ्यात चवीत होणाऱ्या बदलामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतच आंबा उपलब्ध राहतो. गेल्या काही वर्षांत कोकणातील हापूस आंब्यावर कर्नाटकच्या आंब्याने मात केली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणारे नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर बहुतांश आंबा विक्री करणाऱ्या स्टॉलवर कर्नाटकचा आंबा देवगड हापूसच्या नावावर विकला जातो. या कर्नाटकच्या आंब्याची विक्री होण्याला देवगड हापूस आंब्याचे स्टॉल लावून विरोध व्हायला हवा होता; परंतु खुल्या बाजारपेठेत व्यावसायिक गप्प राहिले, तर स्पर्धक व्यावसायिक त्याची संधी तो घेतो आणि दामदुप्पट नफा मिळवतो. मुंबईच्या बाजारात आंबापेटी खराब झाली तर आंबे बदलून दिले जातात. याचे कारण देवगड, रत्नागिरी हापूसच्या नावावर दामदुप्पट दराने कर्नाटकच्या आंब्याची पेटी दिलेली असते. ही पेटी बदलून द्यायला असे बनावट आंबे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपोआप परवडते. याचे कारण कर्नाटकमधून किलोच्या दराने आंबे आणून त्याची देवगड हापूस डझन भावाने विक्री केली जाते.

कर्नाटक राज्यात गेल्या दहा वर्षांत आंब्याच्या बागायती मोठ्या प्रमाणावर उभ्या झाल्या आहेत. यामुळे आंबा पीकही विपूल प्रमाणात येत आहे. गुजरात, पश्चिम महाराष्ट्र या भागातही मोठ्या प्रमाणात आंबा पीक घेतले जाते. फार पूर्वी घाटमाथ्यावर नारळ पीक होत नव्हतं. पश्चिम महाराष्ट्रात नारळ होत नाहीत, असे म्हटले जायचे. कोकण, गोवा, केरळ या राज्यांची नारळाची मक्तेदारी होती. आज ती राहिली नाही. याचे कारण पश्चिम महाराष्ट्रात नारळाच्या बागाही उभ्या दिसतात. जयसिंगपूर भागातून जाताना शे-पाचशे माड उभे दिसतात. कोकणातच नारळ होतात. नारळाला खारी हवाच लागते. या सर्वाला छेद दिला गेला आहे. नारळाचं चांगलं पीक होत आहे. यामुळे कोकणात पिकणारा केवळ आंबाच नव्हे; तर सर्वच पिकांच्या बाबतीत यापुढच्या काळात स्पर्धा अधिक वाढणार आहे.

आपल्या कोकणातील फळांच्या जागी दुसरीकडच्या फळांची विक्री कोकणच्या नावे होण्याची शक्यता वाढणार आहे. त्याची सुरुवात केव्हाचीच झाली आहे. दुर्दैवाने कोकणातील आंबा, काजू व्यावसायिक सहभागी झाले आहेत. आपणच आपला हापूस आंब्याचा ब्रँड मारण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे अधिक दुर्दैवी आहे. क्षणिक पैशाच्या लालसेपोटी जे काही होत आहे, हे दीर्घकालीन धोरणाला फारच मारक ठरणारे आहे. याचा विचार कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी फार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे. जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर देवगडचा हापूस फळ बाजारात शोधावा लागेल. ‘फळांचा राजा’ म्हणून ज्याने अग्रक्रमाने स्थान मिळवले आहे, तोच हापूस आंबा त्याच्याच फळांच्या राज्यात परका होऊन जाईल.

खुल्या अर्थव्यवस्थेत जे टिकावू आहे, तेच टिकून राहील आणि जे आमच्या ‘हापूस ब्रँड’वर कोणी काही करू शकत नाही, असे वाटून घेणार असतील तर या भ्रमातही त्यांनी राहू नये. मागील आंबा हंगामात हजारो कर्नाटकच्या आंबा पेट्या मुंबई-पुण्याच्या बाजारात देवगड, रत्नागिरी हापूसच्या नावे विकल्या गेल्या आहेत. हे मुंबईच्या वाशी मार्केटमध्येही घडले आहे. कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीच जर सावध नसतील, तर मुंबईच्या फळबाजारातील दलाल आपल्या हापूस आंब्याची बदनामी आणि देवगड हापूसवर होणारे अतिक्रमण कसे काय रोखले जाऊ शकते? कर्नाटक आंब्याने भरल्या जाणाऱ्या आंबा पेटीवर देवगड हापूस या नावानेच बॉक्स तयार करण्यात आले आहेत. या पलीकडे जाऊन कर्नाटकमधील आंबा देवगड हापूस वाटावा यासाठी आंबा पॅकिंग करताना जी वृत्तपत्राची रद्दी वापरली जाते, ती रद्दीही कोकणातील वृत्तपत्रांची वापरली जाते. ही सर्व बनवा-बनवी कशा आणि कोणत्या पद्धतीने होते आहे हे आंबा बागायतदारांना माहिती आहेच. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

कोकणचा हापूस आंबा परप्रांतियांच्या बनवा-बनवीतून आणि कोकणातील काही स्वार्थी शेतबागायतदारांपासून वाचवीला जायला हवा, एवढीच यामागची अपेक्षा आणि भूमिका आहे. एकदा मार्केटमध्ये देवगडचा हापूस बदनाम झाला, तर आंबा एखाद्या रोगाने डाग पडला, तर कीटकनाशकाचा मारा करून तो डाग घालवता येईल; परंतु देवगड हापूस एकदा बदनाम झाला तर हा कोकणातील हापूस आंब्यावरचा कलंकित डाग कधीच घालवता येणार नाही. तेव्हा सावध असावे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -