Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीबा विठ्ठला...राज्यातील जनतेला सुखी ठेव!

बा विठ्ठला…राज्यातील जनतेला सुखी ठेव!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे

नाशिक जिल्ह्याचे बबन विठोबा घुगे – वत्सला घुगे ठरले मानाचे वारकरी

सूर्यकांत आसबे

पंढरपूर : ‘बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा’, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्यावेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी झाली. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. धर्मावर कितीही आक्रमणे झाली, तसेच संकटे समोर आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही. त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली. महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला; तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.

मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या ७३ कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील २६ कोटींच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. चंद्रभागा नदी अविरत पणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार रणजीतसिंह मोहिते – पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मानाचे वारकरी…

कार्तिकी एकादशी यात्रे निमित्त गुरुवारीउपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

तेढ निर्माण करणारी वक्तव्ये अयोग्य…

राज्यात सध्या विविध समाजाच्या आरक्षणाचा विषय सुरू आहे. यादरम्यान आपल्या न्याय्य मागण्या मांडणे योग्य आहे.परंतु समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये किंवा एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा ठाकणे हे अयोग्य आहे. लवकरच आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली मार्गी लावू असे अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.कार्तिकी वारीच्या निमित्ताने फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर होते. शासकीय पूजा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांची संवाद साधला.राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली.मराठा समाजाने पूजेला दर्शविलेला विरोध सोडून पूजा करण्यासाठी परवानगी दिली याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे आभार मानले. दूध दरवाढ,शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे यावर सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -