संविधान दिनी घडणार ऐतिहासिक घटना
नवी दिल्ली : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) प्रांगणात घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करुन भारतीय संविधान लिहिणार्या आंबेडकरांचा देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा नव्हता. पहिल्यांदाच असा पुतळा उभारण्यात येणार असल्याने ही ऐतिहासिक घटना असणार आहे.
संविधान दिनी (Constitution Day) २६ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. ७ फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. हरियाणातील मानेसर इथे पुतळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी हा पुतळा साकारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात सध्या महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर आहे. गेल्या वर्षी, डिसेंबर महिन्यात तीन वकिलांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून सुप्रीम कोर्टाच्या लॉनवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर फॉर सोशल जस्टीस’ या संघटनेच्या वतीने या वर्षी एप्रिल महिन्यातही ही मागणी करण्यात आली. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सिल असोसिएशनने देखील (SCACA) पुतळा बसवण्याची मागणी केली होती. सततच्या विनंतीमुळे डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.