
काय आहे पक्षप्रवेशाचं कारण?
जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील (Congress) दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची (BJP) वाट धरली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असून प्रतिष्ठित नेते भाजपच्या हाती लागल्याने भाजपला फायदा होणार आहे. राजस्थानमध्ये असलेल्या विविध महामंडळे, प्राधिकरणे, परीक्षा आयोग यांवर गेल्या पाच वर्षात नेमणुकाच झालेल्या नाहीत. या सर्व प्राधिकरणांची किंवा आयोगांची जबाबदारी सध्या अधिकाऱ्यांवरच आहे. यातून निर्माण झालेल्या नाराजीतून नेत्यांनी भाजपला साथ देणे पसंत केले आहे.
सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य आहे. पण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यावर काँग्रेसमधील नेतेमंडळी नाराज होती. याचे कारण म्हणजे राज्यातील महामंडळे, प्राधिकरणे आणि आयोग यांच्यावरील राजकीय व्यक्तींच्या नियुक्त्यांकडे संबंधित राज्यातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून बघितले जाते. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षात जोधपूर जिल्ह्यातील अशा एकाही प्राधिकरण किंवा महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. आधीच उमेदवारीवरून असलेल्या नाराजीत यामुळे आणखी भर पडली आणि नेते भाजपकडे वळले.
जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दादिच भाजपसोबत
मुख्यमंत्री गेहलोत यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दादिच. थेट जनतेतून आणि शहरातील तीन विधानसभा मतदार संघातून ते ६० हजारपेक्षा अधिक मतांनी महापौर म्हणून विजयी झाले होते. दादिच हे ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी सुरसागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना डावलून या मतदार संघातून काँग्रेसने युवा कार्यकर्ते शाहजाद खान यांना उमेदवारी दिली. आपल्याला डावलल्याचे लक्षात आल्यानंतर दादिच यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. आता या मतदार संघात भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिल्याने त्यांना दादिच यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार आहे.
ब्राह्मण समाजाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष कन्हैयालाल पारिख यांच्या स्नुषा आणि महापौर पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार पूजा पारिख यांनाही असेच डावलण्यात आल्यानंतर त्यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शाम खिचड, करुणानिधी व्यास, अजय त्रिवेदी असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यातील व्यास यांचा जोधपूर शहरात मोठा प्रभाव आहे, ते ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांची मदत सुरसागरसह अन्य मतदार संघात झाली असती, पण त्यांना डावलल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत.