बोगद्यांचे बांधकाम मजबूत करण्यासाठी एनएचएआयने कोकण रेल्वेशी केला सामंजस्य करार
नवी दिल्ली : महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामा दरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व २९ बांधकामाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट, अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे.
एनएचएआयचे अधिकारी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या तज्ञांचे पथक तसेच इतर बोगदा तज्ञांसह बांधकाम सुरु असलेल्या बोगदा प्रकल्पांची पाहणी करतील आणि सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करतील. देशभरात विविध ठिकाणी एकूण सुमारे 79 किमी लांबीच्या 29 बोगद्यांचे बांधकाम सुरु आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील 12 बोगदे, जम्मू-काश्मीरमधील 06, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थानमधील प्रत्येकी 02 आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांमधील प्रत्येकी एक बोगदा समाविष्ट आहे.
‘एनएचएआय’ ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरीही केली आहे. या कराराअंतर्गत, केआरसीएल एनएचएआयच्या प्रकल्पांना बोगद्याचे बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित आराखडा, रेखाचित्र आणि सुरक्षितते बाबतच्या पैलूंचे पुनरावलोकन करण्यासाठी सेवा प्रदान करेल. केआरसीएल बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट देखील करेल आणि आवश्यकता असेल तर, उपाय सुचवेल. या व्यतिरिक्त, केआरसीएल, एनएचएआय च्या अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासाकरता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल. हा करार दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.
यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये, एनएचएआय ने डीएमआरसी बरोबर असाच करार केला होता. या अंतर्गत, डीएमआरसी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील बोगदे, पूल आणि इतर संरचनांचे नियोजन, आराखडा, बांधकाम आणि देखभाल यासाठी सेवा प्रदान करेल.
बोगद्यात अडकलेल्या ४१ मजूरांच्या सुटकेची आज शक्यता
उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर सुटकेची वाट पाहत आहेत. गेल्या अकरा दिवसांपासून देश ज्यांच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना करतोय. बाहेर शेकडो हात त्यांचा हाच संघर्ष यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मजूर आज सूर्योद्य पाहू शकतील, अशी शक्यता आहे. डोंगरावर बोगदा खणण्याचं काम वेगाने सुरु आहे. सर्व काही सुरळीत पार पडलं तर आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मजुरांची सुटका होण्याची शक्यता आहे.
१२ नोव्हेंबरला म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर आपल्या नेहमीच्या कामासाठी पोहोचले. बोगद्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आल्याने बोगद्यात वीज आणि पाण्याची व्यवस्था होती. डोक्यावर हेल्मेट घालून प्रत्येकजण कामात मग्न होता आणि अचानक मोठा आवाज झाला. या आवाजासोबत मातीचा भला मोठा ढिगारा खाली आला आणि सगळे मजूर त्या ढिगाऱ्याच्या मागे अडकले.