Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीKirit Somaiya : मुलुंडचा मुंब्रा करण्याचा उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहल यांचा...

Kirit Somaiya : मुलुंडचा मुंब्रा करण्याचा उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहल यांचा कट

भाजप आमदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मुंबई : भाजप आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुलुंडचा मुंब्रा बनवण्याचा कट हे दोघे मिळून रचत आहेत, असा हा आरोप आहे. मुलुंडमधल्या साडेसात हजार घरांच्या पीईपी घोटाळ्यासाठी हे दोघे जबाबदार आहेत, असं सोमय्या म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांनी मानखुर्द, गोवंडी, बेहराम पाडा या ठिकाणी जे विस्थापित असतील त्या सगळ्या मुस्लिमांना पीईपीमधून घरं देऊन मुलुंडचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नष्ट करण्याचा घाट घातल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. हा पीईपी घोटाळा आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात वर्षभर ही बाब इकबाल चहल यांनी दडवून ठेवली होती. या जागेवर आधी कोव्हिड हॉस्पिटल उभं राहणार होतं. जेव्हा बांधकाम सुरु झालं तेव्हा आम्ही ही सगळी माहिती बाहेर काढली. त्यामुळेच मी हा विषय उचलला आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका यांची पहिली यादी आमच्या हातात आली. २७२ परिवारांना मुलुंड पूर्वमध्ये हलवण्यात येणार आहे. फिरोज अहमद, फिरोज शेख, फैजल हक, दुबेर सत्तार, फद्रू रहमान, जावेद सिद्दीकी अशी २७२ कुटुंबं स्थलांतरित केली जाणार आहेत. मालाडमधल्या नाल्याचं रुंदीकरण होत असल्याने तिथल्या ७२ कुटुंबाना स्थलांतरीत केलं जाणार आहे. फिरोझ नईम, मोहम्मद रिझवी, मोहम्मद हनीफ खान असे सगळे ७२ परिवार स्थलांतरित होणार आहेत.

पुढे ते म्हणाले, महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळेजण पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या कच्च्या झोपड्यांमधून आलेले लोक आहेत. मुंबई महापालिकेने ११९ फूट, ९३ फूट, ९५ फूट, ७८ फूट अशी यांच्या झोपड्यांची नोंद केली आहे. या लोकांना ३०० स्क्वेअरफूट कारपेट असलेली घरं दिली जाणार आहेत. ५४ लाखांचं घर आहे. अशी सात हजार कुटुंबं बेहराम पाडा, चेंबूर, बैंगनवाडी, मालाड या ठिकाणाहून वास्तव्यास येणार आहेत. त्यामुळे मुलुंडचं सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक महत्त्व कमी केलं जातं आहे.

मुलुंडचं मुंब्रा करण्याचं उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांचं कटकारस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवावं अशी विनंती मी करतो आहे. मी टप्प्याटप्प्याने याविषयीच्या याद्या प्रसिद्ध करणार आहे. या लोकांमध्ये बांगलादेशी लोकही आहेत, असाही आरोप सोमय्यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -