Monday, June 30, 2025

Tulsi Vivah 2023 : यंदा तुळशी विवाह कधी? जाणून घ्या परंपरा, पद्धत आणि यंदाचा मुहूर्त...

Tulsi Vivah 2023 : यंदा तुळशी विवाह कधी? जाणून घ्या परंपरा, पद्धत आणि यंदाचा मुहूर्त...

हिंदू धर्मात (Hindu Religion) तुळशीला (Tulsi) विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात (Ayurveda) देखील तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते. पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळस वाढवली जायची. तिच्यामुळे घरात रोगराई येण्यास प्रतिबंध व्हायचा. हल्ली धकाधकीच्या जीवनात दारासमोर तुळस वाढवणेही कठीण झाले आहे. मात्र, तुळशी विवाहाची परंपरा आपण जपली आहे. आजच्या लेखात यंदाच्या तुळशी विवाहाचा मुहूर्त (Tulsi Vivah 2023) आणि यामागील परंपरा आपण जाणून घेणार आहोत.



काय आहे परंपरा?


तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची परंपरा आहे. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.



कसा करतात तुळशी विवाह?


घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.



यंदा तुळशी विवाह कधी?


तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. हा उत्सव वृंदावन, मथुरा आणि नाथद्वारा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी २३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०१ वाजता सुरू होईल. शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:०६ वाजता संपेल. उदयतिथीचा विचार करून तुळशीविवाह २४ नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे.

Comments
Add Comment