
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंसोबत धक्कादायक घटना
मुंबई : निलंबित केल्याचा राग मनात ठेवून व नंतर पुन्हा नोकरीवरही रुजू होऊ न दिल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) माजी कुलगुरुंसोबत (Former Chancellor) घडली आहे. माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान (Dr. Ashok Pradhan) यांच्या घरात घुसून काहीजणांनी हल्ला केला. हल्लेखोर निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात डॉ. प्रधान हे गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील कुलगुरुंच्या घरी ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय जाधव (Sanjay Jadhav) या मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या गैरवर्तन आणि कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे डॉ. अशोक प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी विद्यापीठाचे कुलगुरु असताना संजय जाधव यांना निलंबित केले होते. त्यामुळे प्राध्यापकाचे वेतन घेणाऱ्या आरोपीचे वेतन बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता. याच वादातून कुलगुरुंच्या घरी हल्ला करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे.
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय ५०), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय ३२), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.
नेमका वाद काय होता?
डॉ. अशोक प्रधान हे मुंबई विद्यापीठातून निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांपासून समिती सदस्य म्हणून दुसऱ्या शिक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांना मिळालेल्या तक्रारींवरुन त्यांनी संजय जाधव यांना निलंबित केल्याने जाधव यांना आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच परत रुजू करुन घेण्याची विनंती करण्यासाठी रविवारी संध्याकाळच्या सुमारास ते इतर चार जणांसह प्रधान यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र, नकार देऊनही त्यांनी नोकरीवर रुजू करुन घेण्याचा तगादा लावला होता. अखेर नकारामुळे वाद होऊन काही क्षणातच आरोपी जाधव यांनी डॉ. प्रधानांवर हल्ला केला.
हल्ल्याच्या वेळी प्रधान आणि त्यांची पत्नी दोघेच घरात होते. डॉ. प्रधान यांच्या पत्नीने ताबडतोब पोलिसांना बोलावले. त्यानंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनचे एक पथक प्रधान यांच्या बंगल्यावर पोहोचले, त्यांना रुग्णालयात नेले जेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, ४५२, ३४१, ५०४, ३४ अन्वये सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.