मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य
पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा मराठा समाजाने दिला होता. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर आता मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना विठुरायाची पूजा करता येणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर सरकारकडून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत.
गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येताच प्रशासनाची सूत्रे वेगाने हलू लागली. एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर प्रशासनाने मराठा आरक्षण आंदोलकांच्या सगळ्या गटांसोबत चर्चा केली.
मराठा आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या. प्रशासनाने मागण्या मान्य असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या माहितीनंतर मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.