Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतल्या रस्ते सफाईची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबईतल्या रस्ते सफाईची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पाच वाजताच रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल ऑन द स्पॉट घेत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठक घेण्यात आल्या. विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याची कामे सुरु झाली आहेत. याच कामांची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रदूषणावर नियंत्रण करण्याचे काम केले जात आहेत. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारुन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. तसेच एक दिवसाआड मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले जाईल, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, महापालिकेच्या उपाययोजनांची पाहणी केली. रस्ते धुतले जात आहेत. माती काढली काढली जात आहे. पाण्याची फवारणी केली जात आहे. हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे. स्प्रिंकलर, स्मॉगरचा वापर करून हवेतील धुलीकण कमी करण्यास मदत होणार आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, सकाळी पाच वाजेपासून मी पाहणी करत आहे. मनपाचे अधिकारी या पाहणीत उपस्थित होते. सर्वजण जोराने कामाला लागले आहेत. यामुळे मुंबई स्वच्छ होऊन हवेतील प्रदूषण कमी होणार आहे. चांगली हवा मुंबईकरांना मिळणार आहे. यावेळी नागरिकांनी रस्ते, वाहतूक यासंदर्भात तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी झाडे लावण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना मांडली आहे. पूर्ण बीच स्वच्छता करण्यासाठी एक टीम लावण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालय दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ केले जाईल. याशिवाय मुख्य रस्तेच नाहीत तर आतले छोटे रस्तेही स्वच्छ करण्याची सूचना देण्यात आली आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच घेतली होती. मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे.

नागरिकांशी साधला संवाद

महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाच्या स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. खारदंडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र आणि नवीन जलवाहिनी या परिसरासाठी अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. खार भूयारी मार्ग येथे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री महोदय म्हणाले की ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्ग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर तेथील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे त्यांनी नमूद केले. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चहापान

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. शासनामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील सर्व 46 वस्त्यांमध्ये संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -