Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. या मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत, त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्या जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण आहे.


धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ज्यात, जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि नेत्यांचे भाषण झाले. भाषणानंतर काही लोकांनी जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन निवेदन घेण्याची मागणी केली. पण, जिल्हाधिकारी खाली न आल्याने काही तरुण आक्रमक झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, आक्रमक झालेल्या तरुणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड करायला सुरवात केली. पाहता पाहता मोठा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



प्रशासनाने जोरजबरदस्तीने केसेस दाखल करू नये; जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकरांची मागणी


धनगर समाजाचे आंदोलन हे आपल्याला शांततेच्या मार्गाने करायचे आहे, हिंसक मार्गाने नाही असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच प्रशासनाने जोरजबरदस्तीने केसेस दाखल करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. जालन्यात निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.


पडळकर म्हणाले की, जालना प्रशासनाला सांगणे आहे जोर जबरदस्ती करून केसेस दाखल करू नये. पोलीस अधीक्षक यांच्याशी मी फोनवर बोलून चुकीची कारवाई होऊ नये असे सांगणार आहे. वेळ पडली तर मी जालन्याला जाईन. सरकारने आता यावर लवकर मार्ग काढला पाहिजे. सरकार यातून मार्ग काढेल असा आम्हाला विश्वास आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावी. धनगर समाज आंदोलनाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. आम्ही नव्याने कुठे आरक्षण मागत नाही, असं पडळकर म्हणाले.

Comments
Add Comment