Monday, July 22, 2024
Homeक्रीडाRahul Dravid WC Finale 2023 : पराभवानंतर काय म्हणाले कोच राहुल द्रविड?...

Rahul Dravid WC Finale 2023 : पराभवानंतर काय म्हणाले कोच राहुल द्रविड? ड्रेसिंग रुममधील दृश्य, रोहितसारखा कर्णधार, भारताची खेळी…

अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India Vs Australia) पराभवानंतर करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले आहे. भारतीय संघाने सर्वच सामन्यांत चमकदार कामगिरी करत फायनलपर्यंत मजल मारली, मात्र ट्रॉफी आपल्या नावावर करता आली नाही याची सर्वांनाच खंत आहे. भारतीय खेळाडूंनाही मैदानातच रडू आवरले नाही याचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित शर्माचे (Rohit Sharma) मैदानावरच डोळे पाणावले होते, तर विराट कोहली (Virat Kohli) कॅपने आपले तोंड झाकत ड्रेसिंग रुमकडे गेला.

सर्व भारतीयांना या गोष्टीचे दुःख झाले असले तरी ते पोस्ट, स्टोरीजमधून भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन, पाठिंबा देत आहेत. दरम्यान, भारतीय संघासाठी प्रचंड मेहनत घेतलेले कोच राहुल द्रविडही (Rahul Dravid) भारताच्या पराभवानंतर व्यक्त झाले. राहुल द्रविड जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहण्यासारखे नव्हते. सर्वांचे चेहरे पडलेले होते. खेळाडू खूप नाराज झाले, आता काय करावे हे त्यांना समजत नव्हते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राहुल द्रविड म्हणाले, ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मासह अनेक खेळाडूंच्या डोळ्यांत पाणी होतं. ड्रेसिंग रूममधलं ते वातावरण मला असह्य होतं. एक प्रशिक्षक (Coach) म्हणून हे पाहणं कठीण होतं, कारण मला माहित आहे की या मुलांनी किती मेहनत घेतली आहे, त्यांनी काय योगदान दिले आहे. आम्ही कोणते क्रिकेट खेळलो हे तुम्ही पाहिले आहे. पण हा खेळाचा भाग आहे. असं घडत असतं, असं घडू शकतं.

रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार

रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे. स्टाफचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी त्याने प्रयत्न केला. तो एक चांगला कर्णधार आणि सर्वांनाच नेहमी मदत करणारा व्यक्ती आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो नेहमी इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही संभाषणासाठी तो नेहमी उपलब्ध असतो. तो नेहमीच वचनबद्ध असतो. या स्पर्धेसाठी त्याने बराच वेळ आणि योगदान दिलं आहे, असं राहुल द्रविड म्हणाले.

भारतीय संघाची अंतिम सामन्यातील खेळी

राहुल द्रविड म्हणाले की, आम्ही लक्ष्यापेक्षा ३० ते ४० धावा कमी केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. महत्त्वाच्या वेळी आम्ही विकेट्स गमावल्या. त्याचा परिणाम धावांवरही झाला. त्यामुळे २८०-२९० पर्यंत मजल मारली असती तर हा परिणाम वेगळा झाला असता. ऑस्ट्रेलियाने खरोखरच चांगली फलंदाजी केली. ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट फलंदाजी केली, असं राहुल द्रविड म्हणाले,

उद्याचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी चांगला असेल

या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, त्याबद्दल मी सर्व खेळाडू आणि स्टाफचे अभिनंदन करतो. ऑस्ट्रेलियाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असं राहुल द्रविड म्हणाले. आज पराभव जरी झाला असला तरीही उद्याचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी चांगला असेल अशी अपेक्षाही द्रविड यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -