- अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
दिवाळीच्या काळात अनेकांची विमाने आकाशात दिमाखात मिरवत असल्याचे आढळते! अशा वेळी दस्तुरखुद्द विमान कंपन्यांचे अर्थकारण आणखी रंगतदार होताना दिसत आहे. अलीकडेच एअर इंडियातर्फे दर आठवड्याला एक नवीन विमान प्रवासी सेवेत येणार असल्याची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे, गॅस दरात कपात होताच खपाने नवी उंची गाठली तर स्मार्ट वॉचच्या जमान्यात महागड्या घड्याळांचीही क्रेझ दिसून आली.
दिवाळीचा माहोल म्हटला की, व्यापार- उद्योग जगतातील बरकतीची चर्चा आलीच. या काळात अनेकांची विमाने आकाशात उडत असल्याचे आढळते! अशा वेळी दस्तुरखुद्द विमान कंपन्यांचे अर्थकारण आणखी रंगतदार होताना दिसत आहे. अलीकडेच एअर इंडियातर्फे दर आठवड्याला एक नवीन विमान प्रवासी सेवेत येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याच सुमारास ‘विस्तारा’च्या विमानांमध्ये मोफत इंटरनेट सेवा मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे, गॅस दरात कपात होताच खपाने नवी उंची गाठली, तर स्मार्ट वॉचच्या जमान्यात महागड्या घड्याळांचीही क्रेझ दिसून आली.
टाटा समूहाची विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला पुढील १८ महिन्यांसाठी दर सहा दिवसांनी एक नवीन विमान मिळणार आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, एअर इंडियाने एकूण ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियातर्फे नवी विमाने तैनात केली जात आहेत. आम्ही अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भरती करत आहोत. कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले, एअर इंडियाने ४७० विमानांची ऑर्डर दिली असून पुढील १८ महिन्यांमध्ये दर सहा दिवसांनी एअर इंडियाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. आमच्याकडे नवीन विमाने आहेत. आम्ही अनेक नवीन कर्मचारी भरती करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण पद्धतीतही सुधारणा करत आहोत. आम्हाला अजून काम करायचे आहे. आम्ही चांगली प्रगती करत आहोत. एअर इंडियाच्या बहुसंख्य ग्राहकांना विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा हवा आहे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे आमच्या समोरचे आव्हान आहे. नवी विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती विल्सन यांनी दिली आहे. यासह, बहुतेक जुनी विमाने सेवेत आणली गेली आहेत. एअर इंडियाने भारतीय अर्थव्यवस्थेला आठ टक्के वाढीव वार्षिक वाढ दराने सेवा देण्यासाठी ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. विल्सन यांनी इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि एअर इंडियासाठी वाहतूक वाढवण्याचा विश्वासही व्यक्त केला. एअर इंडिया ही देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नेटवर्क असलेली विमान कंपनी आहे. आगामी काळात कंपनी आपल्या ताफ्यात विमानांची संख्या वाढवून प्रवाशांना नवा अनुभव आणि सेवा देण्याचा विचार करत आहे.
विमानाने प्रवास करताना मोबाइल फ्लाइट मोडमध्ये टाकावा लागतो. विमानात इंटरनेट सेवा बंद असते; पण आता विमानातदेखील मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी ‘विस्तारा’ने विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह विस्तारा एअरलाइन्स विमानात इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे. टाटा सन्स आणि ‘एसआयए’च्या मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने अलीकडेच बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर विमानात मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. ही सुविधा सध्या दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळादरम्यान उपलब्ध आहे. आता कंपनी ही सेवा एअरबस ३२१ न्यूओमध्येदेखील वाढवणार आहे. सर्व प्रवासी फ्लाइटदरम्यान मर्यादित काळासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. विस्तारा ही वायफाय मेसेजिंग लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप वापरता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या प्रवाशांना दीर्घकाळापासून या सेवेचा लाभ देत आहेत. लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता विस्तारादेखील या खास क्लबचा एक भाग होणार आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याचा परिणाम दिसू लागला आहे. केंद्र सरकारच्या घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या निर्णयानंतर देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. २९ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी घरगुती गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त केले. सरकारच्या या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलिंडरची सरासरी संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी आणखी शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आला. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये एलपीजी गॅसची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. घरगुती गॅस सिलिंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या. लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलंडर ५०० रुपयांनी स्वस्त म्हणजेच ६०० रुपयांना मिळत आहे. केंद्र सरकारच नाही तर अनेक राज्यांनीही घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त केले आहेत. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ ५०० रुपयांमध्ये सिलिंडर देत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने तसेच मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारनेही ४५० रुपयांना सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेचे एकूण ९.५९ कोटी सक्रिय लाभार्थी आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी झाली होती.
स्मार्ट वॉचच्या जमान्यातही भारतीयांमध्ये महागड्या घड्याळांची क्रेझ सातत्याने वाढत आहे. पूर्वी फक्त काही हातांवर दिसणारी घड्याळे आता उच्च मध्यम आणि उच्चवर्गीय घरात सहजतेने दिसू लागली आहेत. टायटन एज, रागा, स्टेलर, नेबुलासारखे ब्रँड भारतीयांना आवडू लागले आहेत. घड्याळे आता स्टेटस सिम्बॉल बनली आहेत. स्मार्टवॉचच्या जमान्यातही घड्याळांचा खप झपाट्याने वाढत आहेत. सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींचा तरुणांवर प्रभाव आहे. स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचमुळे भविष्यात लोकांच्या हातातून घड्याळे गायब होतील, असे वाटत होते. त्यांच्या उपयुक्ततेवर प्रश्न उपस्थित केले जात होते; पण सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींनी पुन्हा लोकांच्या हातात घड्याळे आणली. महागड्या घड्याळांची तरुणाईची क्रेझ वाढली आहे. स्मार्टवॉचसोबतच ते घड्याळांवरही खूप पैसे खर्च करत आहेत. कपडे, शूज, घड्याळे ही तरुणांची गरज बनली आहे. महागड्या घड्याळांसोबतच लोकांना बजेटमध्ये बसणारी घड्याळेही आवडू लागली आहेत. या क्षेत्रातल्या मान्यवर परदेशी कंपन्याही भारतात येत आहेत.
टायटन कंपनी लिमिटेडच्या सीईओ सुपर्णा मित्रा यांच्या मते कंपनी या बदललेल्या ट्रेंडकडे संधी म्हणून पाहात आहे. या सेगमेंटला सोशल मीडियाचा खूप फायदा झाला आहे. घड्याळे आता फॅशन सिम्बॉल बनली आहेत. तरुणांनी हा नवा ट्रेंड स्वीकारला आहे. टायटन याकडे संधी म्हणून पाहत आहे आणि त्या दिशेने काम करत आहे. हेलियस या कंपनीच्या प्रीमियम रिटेल चेनने देशभरात १९५ स्टोअर्स उघडली आहेत. आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये सतत नवीन ब्रँड्स जोडत आहोत. या आर्थिक वर्षात कंपनीने मिलास आणि अर्नेस्ट बोरेल या दोन स्विस कंपन्या जोडल्या आहेत. यासोबतच लवकरच चेरियल आणि यू-बोटदेखील कंपनीच्या स्टोअरमध्ये दिसणार आहेत. स्वस्त घड्याळेदेखील आश्चर्यकारक आहेत. परवडणाऱ्या घड्याळांचे फास्ट्रॅक आणि टायटन हे ब्रँड आपापल्या श्रेणींमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना टियर-२ आणि ३ शहरांमध्ये चांगली मागणी आहे. फास्ट्रॅक ब्रँडची घड्याळे १८०० ते ६००० रुपयांदरम्यान तर टायटन सहा हजार ते १३ हजार रुपयांच्या श्रेणीमध्ये खरेदी करता येतात. कंपनी लवकरच १५ हजार रुपयांपेक्षा महाग किमतीची घड्याळे बाजारात आणणार आहे. अमेरिका आणि चीनला मागे टाकून स्मार्टवॉच वापरात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. टायटन ही देशातील चौथी सर्वात मोठी स्मार्टवॉच कंपनी बनली आहे. भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत स्मार्टवॉच विक्रीच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.