संजय राऊतने कधी बॅटही हातात घेतली नाही त्याला क्रिकेटवर बोलायचा काय अधिकार?
भारतीय संघ खेळत असताना गालबोट लावण्याचे काँग्रेसचे षडयंत्र
आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : ज्याने त्याच्या आयुष्यात कधी क्रिकेटची (Cricket) बॅट उचलली नसेल, कधी क्रिकेटचा बॉल हातात घेतला नसेल, स्टम्प्स नेमके कसे असतात ते पाहिलं नसेल तो संजय राजाराम राऊत कालपासून सतत काळ्या मांजरा सारखं विश्वचषकाच्या फायनलसंदर्भात (World Cup Finale) टिप्पण्या करतो आहे, अशा सणसणीत शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. भारत नव्हे तर ऑस्ट्रेलियासोबत भाजप हरली, असं म्हणणार्या संजय राऊतांना नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले, सतत नकारात्मक बोलणं ही संजय राऊतांची सवयच आहे. पण मुळात ज्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही, त्याने क्रिकेटवर किती बोलावं हा एक संशोधनाचा विषय आहे. संजय राजाराम राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुकी आहे, म्हणजेच दलाल आहे. मॅच फिक्सिंग करून सट्टेबाजी करण्यापलीकडे बुकींचा काहीच संबंध नसतो. त्यांनी कधी बॅटही हातात घेतलेली नसते. तोच संबंध संजय राऊत आणि क्रिकेटचा आहे. सतत महाराष्ट्राच्या राजकारणात बुकीसारखं फिक्सिंग करणं, काड्या लावणं यावरच संजय राऊतचं घर चालतं. म्हणून अशा दलालांना क्रिकेट खेळावर बोलायचा अधिकार आहे का, याचा विचार करायला हवा, असं नितेश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, कालच्या वर्ल्डकप फायनल वर राजकीय वास काढत बसणं, सतत भाजपवर बोलत बसणं ही संजय राऊतची एक घाणेरडी सवय झाली आहे. याचा पगार आता दहा जनपथ वरून येतोय. त्याला दहा जनपथची मम्मी सतत सांगत राहते की, भाजपवर आणि पंतप्रधानांवर बोलत राहा. त्यासाठी त्याला तुकडा फेकतात. आणि हा देखील निष्ठावान पालतू कुत्र्यासारखा शेपूट हलवत रोज सकाळी आपल्या मालकाला खूश करण्यासाठी काही ना काही तरी बरळतो.
तुझा मालक गुजरात्यांच्या पैशांवरच जगतो
गुजरातमध्ये ही फायनल झाली, दोन गुजराती माणसांचे पासपोर्ट जप्त करा, असं संजय राऊत बरळले. त्यावर चोख प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, गुजरातचा एवढाच द्वेष असेल तर पहिलं तुझ्या मालकाला गुजराती लोकांबरोबर संबंध बंद करायला सांग. ज्या दिवशी तुझा मालक गुजरातींबरोबर संबंध ठेवायचे बंद करेल तेव्हा मातोश्रीवर चहा नाश्त्याचे देखील वांदे होतील. मातोश्रीचे लोक कुपोषित जाहीर करावे लागतील. कारण लाईटच्या बिल पासून गाड्यांच्या पेट्रोल पर्यंत सगळं गुजरातींकडून घेऊन तुझा मालक जगला असेल तर गुजरातींवर का टीका करतो?
तुझ्या मालकाला वायकर बरोबर फाईव्ह स्टार हॉटेल बांधायचं होतं त्यात गुजराती लोक, जो मॉल तुझ्या मालकाने बांधलाय त्यात गुजराती लोक, तुझा मालक लंडन, साऊथ आफ्रिका फिरायला जातो त्यात गुजराती असतात. तुझ्या मालकाने गुजरातींचा पैसा वापरलेला चालतो पण नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या भारताचा भव्य अंतिम सामना खेळला गेला तेव्हा तुला मिरच्या कशाला झोंबतात? असा जळजळीत सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी राऊतांना फटकारले.
भारतीय संघ खेळत असताना गालबोट लावण्याचे काँग्रेसचे षडयंत्र
काल एका पॅलेस्टाईन समर्थकाने अचानक मैदानात येऊन विराट कोहलीला मिठी मारली. आपल्या देशात पॅलेस्टाईनचे समर्थन सातत्याने कोण करत आलं आहे? एक तर काँग्रेस किंवा काँग्रेसचे समर्थक, इंडिया आघाडी वाले करत आलेले आहेत. त्यामुळे तो पळत आलेला पॅलेस्टाईन समर्थक आणि राहुल गांधींचे काही संबंध आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. देशात पॅलेस्टाईन आणि हमासचे समर्थक काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत. भारतीय संघ खेळत असताना गालबोट लावण्याचे काँग्रेसचे षडयंत्र नाही ना याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
रोहित पवारची संघर्षयात्रा हे सर्वात मोठं नाटक
शासन आपल्या दारी हे एक नाटक आहे, या रोहित पवारांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार हा संघर्षयात्रेच्या निमित्ताने सर्वात मोठं नाटक करतोय. नेमकी ती यात्रा कुठे आहे आणि काय करतेय हे आता दुर्बिण लावून पाहावं लागेल. कदाचित तो त्याच्या घराच्याच आजूबाजूला फेरफटका मारुन त्याला संघर्षयात्रा म्हणत असेल, कारण आता राष्ट्रवादीमध्ये रोहित पवारचं स्थान काय हे कळण्यासाठी त्याने वेगळी संघर्षयात्रा काढावी, असा मी त्याला मैत्रीचा सल्ला देईन, असं नितेश राणे म्हणाले.