- ऐकलंत का! : दीपक परब
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदीतून आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट ‘पॅन इंडिया’ नेण्याचा मानस आहे. हा चित्रपट हिंदीसह ७ विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच उघड होणार आहे. हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. ७ वेगळ्या भाषांत प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. आकर्षक कथानक, कलाकार व दूरदर्शी दिग्दर्शनासह ‘अजाग्रत’ नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाइन असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरीत्या उलगडणारे आहे. शीर्षकाला तितक्याच ताकदीचे टॅगलाइन लाभल्याने या रहस्यमय चित्रपटात काय असेल, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.