Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनशिवराजसिंह विरुद्ध कमलनाथ

शिवराजसिंह विरुद्ध कमलनाथ

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

देशात पाच राज्यांत निवडणुकीच्या प्रचाराची राजकीय रणधुमाळी आहे. या पाच राज्यांत केवळ मध्य प्रदेश हे एकमेव राज्य असे आहे की, तेथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आपली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने या राज्यात सर्वस्व पणाला लावले आहे. आप, बसप, सपा हे प्रमुख राजकीय पक्षही रिंगणात उतरल्यामुळे कोणाकोणाची मते खाणार त्यावर अनेक मतदारसंघांचे गणित ठरणार आहे.

सन २०१८ पेक्षा मध्य प्रदेश विधानसभेची यंदाची निवडणूक वेगळी आहे. आपला किल्ला वाचविणे हे भाजपापुढे मोठे आव्हान आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची झलक असू शकतो म्हणूनच या राज्यातील निकालाला महत्त्व आहे. विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला राज्यात मतदान झाले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने या राज्यात ३९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. २३० सदस्यांच्या मावळत्या विधानसभेत भाजपाचे १२७ आमदार आहेत. काँग्रेसचे ९६ आमदार आहेत. त्याशिवाय अपक्ष ४, बसप २, सपा १ आमदार आहेत.

सन २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ११४ आमदार निवडून आले होते व काँग्रेस हा नंबर १ चा पक्ष ठरला होता. त्या निवडणुकीत भाजपाचे १०९ आमदार विजयी झाले होते व भाजपा नंबर २चा पक्ष ठरला होता. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकारही स्थापन झाले. पण तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात बंड केले व त्यांच्या समर्थक आमदारांसह ते भाजपामध्ये सामील झाले. या घटनेनंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले.

ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नोव्हेंबर २०२० मध्ये २८ मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. त्यातल्या १९ मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला, तर ९ मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आले. भाजपाकडे स्पष्ट बहुमताचा आकडा आल्याने शिवराजसिंग चौहान यांचे स्थिर सरकार राज्याला मिळाले. त्यानंतरही नोव्हेंबर २०२१ मध्ये ३ मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. त्यात २ जागा भाजपाला मिळाल्या व एक जागा काँग्रेसला मिळाली.

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. स्वत: शिवराजसिंह चौहान हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहेतच. पण प्रचारात भाजपाने सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावूनच निवडणूक लढवली. राज्यातील भाजपाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा मोदींचा करिष्मा अधिक आहे, हे सामान्य कार्यकर्त्यालाही चांगले समजते. स्वत: शिवराजसिंग हे स्वत: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असले तरी निकालानंतर काहीही घडू शकते.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपाने तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना पक्षाचे उमेदवार म्हणून उतरवलेत. त्यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो, याचे संकेत पक्षाने दिले.

काँग्रेसने ७७ वर्षांचे कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रकाशात ठेवले आहे, तर दुसरीकडे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून मते मागितली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ज्योतिरादित्य शिंदे अशा अनेक नेत्यांनी भाजपाच्या प्रचारासाठी मध्य प्रदेश पिंजून काढला. काँग्रेसच्या प्रचारात प्रियंका वाड्रा या सर्वाधिक सक्रिय दिसल्या. याखेरीज राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंग, कमलनाथ हे प्रचारात आक्रमक दिसले.

मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारात काँग्रेसने रोजगाराचा मुद्दा जोरदार मांडला. गेल्या निवडणुकीत नोकऱ्यांमधील भरतीत झालेला भ्रष्टाचार हा मुद्दा गाजला होता. परीक्षांमध्ये घोटाळे व भरतीला विलंब या वरून राज्यात बेरोजगारांचे आंदोलन, धरणे, सतत चालू असते. या मुद्द्यांवरच काँग्रेसने प्रचारात जास्त आवाज उठवला. काँग्रेस सत्तेवर आली, तर परीक्षा पारदर्शक होतील, युवकांना न्याय मिळेल असे काँग्रेस सांगत राहिली. या निवडणुकीत आदिवासी व महिला मतदारांच्या व्होट बँकेवर भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते, विजयी व्हायचे तर या व्होट बँकेचा पाठिंबा मिळविणे गरजचे आहे, हे दोन्ही पक्ष चांगले जाणून आहेत.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केलेली ‘लाडली बहन’ योजना खूप लोकप्रिय झाली आहे. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न किंवा पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल, तर त्या महिलेला दरमहा शासनाकडून १ हजार रुपये दिले जातात. याशिवाय शिवराज सिंह चौहान सरकारने लाडली बहना आवास योजना व रास्त दरात गॅस सिलिंडर योजनाही सुरू केली आहे. मतदारांना भुलविण्यासाठी भाजपा सरकारने या योजना जाहीर केल्या, अशी टीका काँग्रेसने केली. निवडणुकीसाठी काँग्रेसने ११ कलमी, तर आम आदमी पक्षाने १० कलमी वचननामा घोषित केला. त्यात आदिवासी व महिलांसाठी आपला पक्ष काय करणार यासंबधी आश्वासनांची जंत्री आहे.

२०१८ नंतर मध्य प्रदेशचे राजकारण बदलले. ज्योतिरादित्य शिंदेंसारखा राजघराण्यातील दिग्गज नेता काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेल्यानंतर भाजपाला राज्यात मोठी ताकद प्राप्त झाली. पण गेल्या काही दिवसांत भाजपामधून अनेक नेते काँग्रेसमध्ये सामील झाले, याकडे भाजपाला दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्योतिरादित्य यांचे काही समर्थकही काँग्रेसकडे परत गेले आहेत. माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी, शिवपुरीतील कोलारसचे माजी आमदार वीरेंद्र रघुवंशी, माजी आमदार भंवरसिंह शेखावत, खरगोनचे माजी खासदार मलखानसिंह सोलंकी हे काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रहाल्द पटेल, फगनसिंह कुलस्ते हे सर्व भाजपाचे केंद्रीय नेते उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात आहेत. याशिवाय भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार राकेश सिंह, गणेश सिंह, रिती पाठक, उदय प्रताप सिंह, कैलास विजयवर्गीय असे भाजपाचे तगडे नेते मैदानात आहेत. निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित होणार असल्याने नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल व विजयवर्गीय हे मुख्यमंत्रीपदाचे आतापासूनच प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

शिवराजसिंह चौहान राज्याचे २० वर्षे मुख्यमंत्री आहेत. शिवराजसिंह यांच्या जागी नवा चेहरा आणावा याच हेतूने केंद्रातील व संसदेतील दिग्गज नेत्यांना पक्षाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले असावे. विजयवर्गीस निवडणुकीत आहेत हे समजू शकते पण केंद्रीय मंत्र्यांनाही राज्याच्या निवडणुकीत उतरवणे या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले.

काँग्रेसचे ७८ वर्षांचे नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ३ लाख ६४ हजार ८२२ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या बलाढ्य नेत्याचा भाजपाच्या साध्वीने केलेला पराभव मतदार विसरलेले नाहीत. गेले महिनाभर चाललेल्या निवडणूक प्रचारात कमलनाथ व दिग्विजय सिंह या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या टीकेचे टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केले होते. आपल्या मुलांचा राजकारणात जम बसावा म्हणून हे दोन्ही नेते अटोकाट प्रयत्न करीत आहेत, हे त्यांच्या प्रचारातून स्पष्ट जाणवले.

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत ५ माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आपले नशीब आजमावत आहेत. जयवर्धन सिंह (काँग्रेस) हे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र आहेत. ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. कमलनाथ यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. ध्रुव नारायण सिंह (भाजपा) हे माजी मुख्यमंत्री गोविंद नारायणसिंह यांचे पुत्र आहेत. दीपक जोशी (काँग्रेस) हे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र आहेत. अजय सिंह (काँग्रेस) हे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचे पुत्र आहेत. ते दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. ओमप्रकाश सकलेचा (भाजपा) हे माजी मुख्यमंत्री वीरेंद्रकुमार सकलेचा यांचे पुत्र आहेत. ते सध्या शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये मंत्री आहेत.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -