- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
कल्पना करा, दोन बहिणी आहेत. एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरीला प्रियकराशी लग्न करायला ही बहीण मदत करते आहे. पण अचानक एका अपघातात विवाहित बहिणीचा अंत होतो, मुले अनाथ होतात. जर तिच्या पतीने दुसरे लग्न केले, तर मुलांना सावत्र आईचा त्रास होईल म्हणून घरच्यांनी धाकट्या बहिणीलाच मेहुण्याशी लग्न करायला लावले तर?
नेमकी हीच कथा होती बी. आर. चोप्रा यांच्या १९६३च्या ‘गुमराह’ची! फक्त यात पुढे योगायोगाने मीनाची (माला सिन्हा) पुनर्भेट तिचा प्रियकर राजेंद्र (सुनील दत्त) याच्याशी होते आणि त्यांचे प्रेम पुन्हा फुलू लागते. कमलाच्या (निरुपा रॉय) मृत्यूनंतर तिच्या पतीशी (अशोककुमार) विवाहबद्ध झालेल्या मीनाला राजेंद्रबद्दलचे प्रेम आवरता येत नाही म्हणून ती पथभ्रष्ट, अर्थात ‘गुमराह’ ठरते! चोप्रांनी सिनेमाचे नाव तेच ठेवले.
तब्बल ६० वर्षांपूर्वी हा विषय स्फोटक होता. पण चोप्रा यांनी तो असा हाताळला की, सिनेमा हिट झाला. त्याचा ‘विवाहिता’ या नावाने मल्ल्याळम रिमेकही निघाला!
सिनेमाला चार पारितोषिके मिळाली. तीन फिल्मफेयर अॅवाॅर्ड्स – सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचे शशिकलाला, सर्वोत्तम गायकाचे महेंद्र कपूर यांना, सर्वोत्तम संकलनाचे प्राण मेहरा यांना तर बी. आर. चोप्रा यांना सर्वतृतीय हिंदी चित्रपटाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले.
दिग्दर्शकांनी विवाहबाह्य प्रेमाचा विषय भारतीय सांस्कृतिक परिघात यशस्वीपणे हाताळला होता तसा गीतकार साहीर लुधियानवी यांनी सिनेमात एक ऐतिहासिक विक्रम करून ठेवला आहे. प्रेमाच्या शोकांतिकांत एक क्षण हमखास येतो की प्रेम कितीही खरे, अस्सल असले तरी ते समजून-उमजून संपवावे लागते. त्या अस्वस्थ, जीवघेण्या क्षणासाठी साहीरसाहेबांनी लिहिलेले एक गाणे सर्व हरलेल्या प्रेमिकात अजरामर आहे आणि हिंदी भाषा आहे तोवर अजरामरच राहणार आहे. ते साहीरचे शब्द –
“चलो एक बार फिरसे,
अजनबी बन जाये
हम दोनो…”
हे अनेक अर्थांनी अद्वितीय होते.
पण त्यावर पुन्हा कधीतरी…
असेच सिनेमाच्या सुरवातीला संगीतकार रवींच्या दिग्दर्शनात महेंद्रकपूरने गायलेले एक रोमँटिक गाणेही खूप लोकप्रिय झाले होते. त्यात काही ओळी आशाताईंच्या ताज्यातवान्या आवाजात आल्यामुळे तर गाणे अधिकच श्रवणीय बनले. प्रेमाच्या, सुरवातीच्या उत्साही वातावरणातले, साहिरचे शब्द होते-
इन हवाओंमें, इन फ़िज़ाओंमें,
तुझको मेरा प्यार पुकारे..
आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे..
पुढे लगेच येणारे आशाताईंच्या आवाजातले शब्दांत वेगळीच नजाकत होती –
रुक ना पाऊं मैं, खिचती आऊं मैं,
दिलको जब दिलदार पुकारे…
जीवनातल्या प्रत्येक सुंदर गोष्टीचे, सुखद अनुभवाचे श्रेय प्रेमिक आपल्या जिवलगालाच देतो. तो म्हणतो, ‘या खळखळ वाहणाऱ्या निर्झरामधील गती, सुंदर फुलांतले नयनरम्य रंग तुझ्यामुळेच तर आहेत. माझे सगळे जीवन प्रेमातील आतुरतेच्या झोक्यावर तुझ्यामुळेच तर झोके घेते आहे. कितीतरी आशा-अपेक्षांची आंदोलने उसळत आहेत, माझ्या हातांचा हार तुझ्या गळ्यात पडायला किती उतावीळ झालाय!
तुझसे रंगत, तुझसे मस्ती,
इन झरनोमें, इन फूलोंमें…
तेरे दमसे मेरी हस्ती
झूले चाहतके झूलोंमें…
मचली जायें शोख उमंगे,
दो बाहोंका हार पुकारे,
आजा आजा रे…
माझ्या हृदयात धडधड होतेय ती तुझ्याच हृदयातील धडधडीचा प्रतिध्वनी आहे इतके आपण एकरूप झालोत. माझ्या डोळ्यात तुझ्याच डोळ्यातली जादू जाणवते आणि ओठांवर तुझे ओठ आहेत असाच भास होत राहतो. प्रत्येक श्वासात तुझ्या श्वासांचा सुंगध येतो. केशकलापातील प्रत्येक बट तुझ्या बोटांच्या स्पर्शासाठी आतुर आहेत –
दिलमें तेरे दिलकी धड़कन,
आँखमें तेरी आँखका जादू,
लबपर तेरे लबके साये,
साँसमें तेरी साँसकी खुशबू,
ज़ुल्फ़ोंका हर पेंच बुलाये,
आँचलका हर तार पुकारे,
आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे.
आता कितीही अडचणी येवोत आपली सोबत अशीच अतूट रहायला हवी. देहातून प्राण गेला तरी चालेल, पण हातातून तुझा हात सुटू नये. आता सगळ्या जगाने जरी हाका मारमारून थांबवले तरी आपण मागे वळून पाहायचे नाही –
लाख बलाये सरपर टूटे,
अब ये सुहाना साथ न छुटे,
तनसे चाहे, जान छुट जाये,
हाथसे तेरा हाथ न छुटे…
मूडके तकना ठीक नही हैं,
अब चाहे संसार पुकारे..
गाण्याचा हा भाग साहिरने मीना आणि राजेंद्रच्या प्रेमाच्या आनंदी काळासाठी लिहिला होता. हेच गाणे पुन्हा येते, तेव्हा परिस्थिती बदलली आहे. मीनाचे लग्न अशोकशी झालेले आहे आणि अस्वस्थ राजेंद्र पुन्हा तिच्या जीवनात आला आहे. त्याची कैफियत नकळत या गाण्याच्या दुसऱ्या भागात साहिरने मांडली आहे.
राजेंद्र म्हणतो आजही माझे मन तुझ्यासाठी आसुसले आहे. पण माझ्या हाका जणू तुझ्या हृदयाच्या भिंतीवर आपटून परत येताहेत. कालपर्यंत माझा हात पकडून चालणारी तू मला सोडून निघून गेली आहेस. मी जुन्या आठवणी काढून कितीही आर्जवे केली तरी ती तुला आठवत नाहीत –
लौट रही हैं मेरी सदायें दीवरोंसे सर टकराके,
हाथ पकड़कर चलनेवाले
हो गये रुख़सत हाथ छुड़ाके…
उनको कुछ भी याद नहीं है,
अब कोई सौ बार पुकारे… आजा आजा रे…
प्रेमाच्या धुंदीत आपली कहाणी इतक्या लगेच संपेल असे कधीच वाटले नव्हते. तू अशी मला परकी होशील आणि माझ्या मनाची अवस्था वेड्यासारखी होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. कालच तुझ्या हातांचा हार माझ्या गळ्यात होता ना? आणि आज अश्रूंची माळ? असे करू नकोस प्रिये, परत ये…
इल्म नहीं था इतनी जल्दी खत्म
फ़साने हो जायेंगे,
तुम बेगाने बन जाओगे, हम दीवाने हो जायेंगे,
कल बाहोंका हार मिला था,
आज अश्कोंका हार पुकारे,
आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे.
तुझ्या जाण्याने माझे अवघे विश्व लुटूले गेले आणि तू नव्या प्रेमाच्या झोपाळ्यावर झोके घ्यावेस? तुझे हृदय इतके कठीण कसे झाले? काहीतरी बोल ना! बघ तुझीच एक आठवण, तू मोडलेले वचन तुला बोलावतेय. ये प्रिये, परत ये –
लुटके मेरे दिलकी दुनिया,
प्यारके झुले झुलनेवाले,
पत्थर बनकर यु चूप क्यो हैं,
कुछ तो कह लो भूलनेवाले.
इक पुरानी याद बुलाये,
एक टूटा इकरार पुकारे. आजा आजा रे…
प्रेम हे मुळात परस्परांना दिलेले वचन असते. ते तोडणे किती वेदनादायी असते तो अनुभव न घेताही जुने गीतकार आपल्याला उत्कटपणे जाणवून देत असत. हे पाहिले की, त्यांना पुन्हापुन्हा सलाम करावासे वाटतात!