- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
अलिबाग! पर्यटक, निसर्ग भटक्यांची आवडती जागा. अलिबागच्या अष्टागर परिसरात जसा शांत-नितळ समुद्रकिनारा आणि निसर्गसुंदर खेडी आहेत, त्याचप्रमाणे या देखाव्यात एक-दोन ठिकाणी डोंगरझाडीचे उंचवटेही आहेत. यातल्याच एका डोंगररांगेत अलिबाग अष्टागरचे दैवत दडले आहे-कनकेश्वर.
अलिबागहून रेवसकडे जी वाट जाते या वाटेलगतच कनकेश्वरचा डोंगर. इथे यायचे असेल, तर रेवस रस्त्यावरील मापगाव फाट्यावरून आत वळावे. हे मापगाव कनकेश्वर डोंगराच्या पायथ्याचे गाव. अलिबागहून मापगावपर्यंतचे अंतर १३ किलोमीटर. या गावातूनच कनकेश्वराकडे जाणारा पायरी मार्ग आहे. तसे या गिरिस्थानी जाण्यासाठी डोंगराच्या चारही बाजूंनी मार्ग आहेत. कुठल्याही बाजूने गेलो तरी डोंगर चढून जावे लागते. पण त्यातही मापगावकडील हा मार्ग सोपा आणि वाहता आहे. गाव संपले की, लगेचच हा कनकेश्वराचा डोंगर सुरू होतो. याच्या पायथ्यापासूनच थळच्या ‘आरसीएफ’ कारखान्याचा खासगी रेल्वेमार्ग जातो.
कनकेश्वर डोंगराची उंची ३८४ मीटर. सात-आठशे पायऱ्यांचा हा मार्ग. सुरुवातीची चढण अंगावर येणारी, पण पुढे थोड्याच वेळात सुरू होणारी झाडी घालवत एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आंबा, साग, सावर, हिरडा, बेहडा, जांभूळ, पांगारा आणि अशीच कितीतरी झाडे. पुन्हा त्या जोडीने सर्वत्र करवंदीची दाट जाळी. हे असे अचानक जंगल पाहिल्यावर आपण कोकणात आहोत, की सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हा प्रश्न पडतो. डोंगर पायथ्याशी असलेल्या मापगावातून सुमारे ७५० पायऱ्या चढून गेल्यावर येणारी निसर्ग सौंदर्याची अनुभूती थकवा नाहीसा करते. कोकणातील जांभ्या दगडात पारंपरिक पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून अलीकडे त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुंबई-पुण्यातील पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी याठिकाणी आवर्जून येतात. वेड्यावाकड्या पायवाटेवर जांभा दगडात कोरलेल्या पायऱ्यांवरून चढताना अलिबाग परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर दिसते ते पश्चिमाभिमुख कनकेश्वर मंदिर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी. पुष्करणीत मे महिन्यापर्यंत पाणी असते.
रघुजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराची पुष्करणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन १७७४ जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते. दगडी ब्रम्हकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर आहे. या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता केवळ बेल वाहिले जाते. एका आख्यायिकेनुसार, कनकासूर नावाच्या राक्षसाने महादेवाचा तप केला आणि वर म्हणून त्याच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले. कनकासुराने डोंगरावर शंकर बरोबर वास्तव्य असावे, असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्याला मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.
कनकेश्वर हे आंग्य्रांचे कुलदैवत! आंग्य्रांनी त्यासाठी पायथ्याचे सागाव नावाचे खेडे या देवस्थानला दत्तक म्हणून दिले. मापगावकडून कनकेश्वरकडे जाणारी ही निसर्गवाट इसवी सन १७६४ मध्ये सरदार राघोजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास यांनी तयार केली. या वाटेवरील एका पायरीवर उजव्या पावलाचा एक ठसा आहे. त्याला ‘देवाची पायरी’ म्हणतात. आंग्य्रांच्या दिवाणांचे हे पुण्यकर्म पाहून जणू देवानेही या मार्गावर आपले पाऊल उमटवले, अशी या पायरीमागची श्रद्धा! कथा काहीही असो, पण यामुळे या निसर्गवाटेला चैतन्य प्राप्त होते. गाईच्या मूर्तीचा गायमांड, फुलांऐवजी झाडांचा पाला वाहिला जाणारा पालेश्वर, त्याच्या शेजारचेच ते कलात्मक ब्रह्मकुंड असे हे एकेक स्थळ पाहात तासा-दोन तासांत आपण कनकेश्वराच्या दारी येऊन ठेपतो.
गर्द राईत बुडालेला डोंगर आणि त्याच्या माथ्यावर हे रम्य, शांत स्थळ! पाण्याने भरलेली एक विस्तीर्ण पोखरण. पश्चिमाभिमुख असे हे मंदिर अकराव्या शतकातील. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर पद्धतीचे शिखर अशी याची रचना. यातील बदल केलेला सभामंडप सोडला, तर अन्य सर्व भाग मूळचा. तारकाकृती विन्यास असलेल्या या मंदिराची रचना त्याच्या त्या असंख्य कोनांच्या-घड्यांच्या भिंतींमध्ये गुंतवून टाकते. जमिनीपासून निघणारे हे कोन थेट शिखरापर्यंत सरळ रेषेत जातात. एकूण २८ कोन, त्या प्रत्येक घडीदरम्यानच शिल्पकाम उठवलेले. यात वानरांच्या माळा आहेत. हत्तीच्या जोड्या आहेत. ध्यानस्थ योग्यांच्या प्रतिमा आहेत. या साऱ्या देखाव्यात जागोजागी कलात्मक देवड्या कोरल्या असून, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, गायत्री, सावित्री, सरस्वती, भैरव, तांडवनृत्यमग्न शंकर, गणेश, कृष्ण आदी देवतांची शिल्पे विसावली आहेत. पायापासून शिखरापर्यंत केलेल्या या शिल्पांकनामध्येच हे शिखर चढणारी एक मानवी आकृतीही कोरली आहे. हे शिल्प अवश्य पाहावे. ते तयार करतानाच मूळच्या दगडातून त्याच्या पायाभोवती एक वाळा कोरला आहे. सुटा, हलता असलेला हा वाळा जणू काही ते शिल्प तयार झाल्यावर त्याच्या पायातच कुणीतरी घातल्यासारखा वाटतो. कलाकाराचे हे कसब थक्क करून सोडते.
अंतराळाचे आयताकृती छत विविध भौमितिक आकृत्यांनी सजवले आहे. या वर्तुळाकृती नक्षीच्या दोन्ही बाजूस हाती सर्प घेतलेल्या गंधर्वमूर्ती अवकाशी विहार करत असतात. गर्भगृहाचे प्रवेशद्वार तर या शिल्पकामाने निव्वळ जडवले आहे. द्वारपाल, गणेशपट्टी, द्वारशाखा असे बरेच काही. यातील द्वारशाखांमध्ये सर्वात आतील शाखेवर पुष्पमाला हाती घेतलेले गंधर्व, मधल्या शाखेवर वादकांचा मेळा, तर बाह्य शाखेवर देवप्रतिमा कोरल्या आहेत. दोन्ही बाजूस द्वारपाल उभे आहेत. त्याखाली पुन्हा देवप्रतिमा, चामरधारी सेवक. तळाशी मध्यभागी कीर्तिमुख, दोन्ही बाजूस व्याघ्रमुख. प्रवेशद्वाराच्या माथ्यावर पुष्पमाला, यक्षगंधर्वाचे दोन थर आणि त्यामध्ये गणेशपट्टी असा हा प्रवेशद्वाराचा देखावा आहे. चार पायऱ्या उतरत आत जावे तो शिवलिंग आणि त्यावरील चांदीच्या मुखवट्यात कनकेश्वर स्थापन झालेला दिसतो. चांदीचा तो मुखवटा दूर केला की, त्याखाली पाण्याने भरलेला एक खळगा दिसतो. हात घातला, तर त्यात पाच उंचवटे लागतात. हाच तो पंचलिंग महादेव कनकेश्वर.या साऱ्या परिसरात तशी मनुष्य-भाविकांची वर्दळ बेताचीच असल्याने भोवतालचा निसर्ग आणि शांतता यामध्ये इथे खराखुऱ्या दैवी सान्निध्याचा अनुभव येतो. अगदी रेवसच्या खाडीपासून ते अलिबागपर्यंतचा. दहा-पंधरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्या अलीकडचा नारळी-पोफळीचा भाग साऱ्या अष्टागरचे सौंदर्य दाखवत असतो. कुलाबा आणि समोरचे खांदेरी-उंदेरीचे ते जलदुर्ग एखाद्या छोट्याशा ठिपक्याप्रमाणे भासतात. संध्याकाळ होत आली असेल तर या साऱ्या भागावर मावळतीचे रंग त्यांचा कैफ चढवू लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत, सुंदर निसर्गाच्या सानिध्यातील कनकेश्वर मंदिरात श्रावणमासात भाविकांची सतत वर्दळ असते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)