Wednesday, January 15, 2025
Homeसाप्ताहिककोलाजHummingbirds : अंतहीन ऊर्जात्मक गुंजन पक्षी...

Hummingbirds : अंतहीन ऊर्जात्मक गुंजन पक्षी…

  • निसर्गवेद : महालक्ष्मी वानखेडेकर

हमिंग बर्ड म्हणजेच गुंजन पक्ष्याची नजर खूपच चांगली असते. हे अल्ट्राव्हायोलेट किरणसुद्धा पाहू शकतात, जे मानव पाहू शकत नाही. आपण जे रंग पाहू शकत नाही, ते सुद्धा रंग हमिंग बर्ड पाहू शकतात. दिवसभरामध्ये एक ते दोन हजार फुलांवर हे पक्षी बसतात. या पक्ष्यांची स्मरणशक्ती खूप तेज असते. एखाद्या फुलावर ते बसले की, परत दुसऱ्यांदा त्या फुलावर बसत नाहीत.

जगातील सर्वात लहान पक्षी हमिंग बर्ड म्हणजेच गुंजन पक्षी. त्यांच्या गतिमान पंखांमुळे गुणगुणल्यासारखा एक विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. त्यामुळेच यांना ‘गुंजन पक्षी’ म्हटले जाते. हा पक्षी सतत आवाज करत असतो. खूप लहान असल्यामुळे आवाजही खूप हलका आणि मंजुळ, थोडासा चिमणीसारखा आणि तीव्र गतीने पंख हलवल्यामुळे मधमाशीसारखा असतो. सर्वात लहान पक्षी हा फक्त ५ सें.मी.चा आहे आणि जास्तीत जास्त ७ सें.मी. आहेत; परंतु यांच्या उपजातीतील जास्तीत जास्त मोठा पक्षी २३ सें.मी.चा आढळतो.

हे मूळचे अमेरिकेतील पक्षी आहेत. त्यात ट्रॉचिलीडे या जैविक कुटुंबाचा समावेश आहे. सुमारे ३६६ प्रजाती आणि ११३ प्रजातींसह अलास्का ते टिएरा डेल फ्युगोपर्यंत आढळतात. यांची बहुतेक प्रजाती दक्षिण आणि मध्य अमेरिकेत पाहायला मिळते. हे पक्षी भारतात दिसत नाहीत; परंतु यांची एक प्रजाती “सन बर्ड्स” ही हमिंग बर्डसारखीच असते. हे पक्षी वाळवंटात, वर्षावनात, पर्वतांमध्ये, समुद्रकिनाऱ्याजवळ असे विविध ठिकाणी आढळतात. थोडक्यात काय तर जिथे फुले दिसतील तिथे हे पक्षी दिसतात. हमिंग बर्ड मधमाशी आणि चिमणी यांचा वंश आहे असं म्हणतात. काही हमिंग बर्ड्स मधमाशी एवढे सुद्धा दिसतात, जे क्युबाच्या जंगलामध्ये आढळतात म्हणूनच त्यांना “मधमाशी गुंजन पक्षी” असे म्हणतात. मधमाशी हमिंग बर्ड हा जेमतेम सव्वादोन इंचाचा असतो आणि याचे वजन दोन ग्रॅमपेक्षा सुद्धा कमी असते.

यांचे मूळ अन्न आहे फुलांमधील रस. निसर्गनियमानुसार यांची चोच खूप लांब असते. फुलांचा रस शोषताना यांना बऱ्याचदा हवेत उडत राहावे लागते म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांच्या पंखांत प्रति सेकंद १० ते ८० वेळा फडफडत राहतील, एवढी शक्ती दिली आहे. जगातील एवढ्या वेगाने पंख फडफडवणारा हा एकमेव पक्षी आहे. हवेत एका जागी हा स्थिर सुद्धा उभा राहू शकतो आणि वर-खाली, उलट-सुलट कसाही उडू शकतो, यामुळेच याला “हेलिकॉप्टर पक्षी” असेही म्हणतात. यांची शारीरिक विशेषता: म्हणजे यांची चोच सुईसारखी आणि खूपच मोठी असते. यांची हालचाल खूप जलद असते. यांची जीभ ही नळीच्या आकारासारखी असते ज्यातून ते फुलांचा द्रव पितात. यांची जीभ दोन दिशेला विभागलेली असते. चिलीमधील सर्वात जास्त परागकण विखुरणारे म्हणून या पक्ष्यांची ओळख आहे. जवळजवळ वीस टक्के परागकण हेच पक्षी विखुरतात. हे निसर्गात वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलनाचे सर्वात मोठे कार्य करीत असतात.

यांचे पाय खूपच नाजूक असल्यामुळे हे पक्षी चालत नाही. जास्तीत जास्त ते झाडावर आपल्याला बसलेले दिसतात; परंतु ते झाडावर बसण्यापेक्षा जास्त उडतात. या पक्ष्यांची नजर खूपच चांगली असते. हे अल्ट्राव्हायोलेट किरणसुद्धा पाहू शकतात, जे मानव पाहू शकत नाही. आपण जे रंग पाहू शकत नाही ते सुद्धा हमिंग बर्ड रंग पाहू शकतात. असं म्हणतात की, दिवसभरामध्ये एक ते दोन हजार फुलांवर हे पक्षी बसतात. या पक्ष्यांची स्मरणशक्ती खूप तेज असते. एखाद्या फुलावर ते बसले की, परत दुसऱ्यांदा त्या फुलावर बसत नाही.

हमिंग बर्ड एका सेकंदात २०० वेळा सुद्धा पंख फडफडवतात त्यामुळे त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा तेवढाच जलद होतो. त्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड एका मिनिटाला १२०० वेळा होते. इतर पक्ष्यांच्या पंखाची फडफड जास्तीत जास्त ५० ते ८० वेळाच होत असते. रुबीत रोटेड पक्षी जेव्हा आराम करतात, तेव्हा प्रति मिनिट २५० वेळा श्वास घेतात. कीटक, कोळी, मुंग्या, माश्या, सुरवंट, बीटल आणि डास हे त्यांचे पूरक आहार आहेत. कधी कधी ते फळ सुद्धा खातात, यातून त्यांना खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात.

या जगातील कोणतेही पक्षी एकाच घरट्यात कायमचे राहत नाही. ते गरजेप्रमाणे घरटी बनवतात. त्यांची घरटी ही पर्यावरणपूरक असल्यामुळे ती सहज पर्यावरणात विलीन होतात. घरटी बनवण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्यांचे स्थान हे निसर्गावरच अवलंबून असते. हे पक्षी घरट्यांची निवड करण्यासाठी झाडेझुडपे अगदी सुरक्षित आणि संरक्षित जागा शोधतात. जागा शोधल्यानंतर मादी हमिंग बर्ड घरटे बांधण्यास सुरुवात करते. हे घरटे शेवाळे, फर, नरम पंख आणि चिकट पदार्थ, कोळ्यांची जाळी यांपासून लहान कपाच्या आकाराचे बनवलेले असते. काही वेळेला हे मोठ्या पानांमध्ये सुद्धा बनवतात. यांचे घरटे खूपच नाजूक तरीही मजबूत, थोडेसे चिकट आणि अतिशय सुंदर असते. मादी हमिंग बर्ड अंडी दिल्यावर पिल्लांना उबवते, तेव्हा नर त्यांना अन्न पुरवतो. नेहमीप्रमाणेच जेव्हा पिल्लांमध्ये उडण्याची क्षमता येते, तेव्हा ते घरटे सोडून जातात.

सर्वच पक्ष्यांचे आयुष्य त्यांच्या अन्न, हवामान आणि परिस्थिती यानुसार बदलत असते. सर्व पक्ष्यांप्रमाणेच हे सुद्धा अन्नाच्या शोधात स्थलांतरित होत असतात. रुबी थ्रोटेड हमिंग बर्ड १२.०० कि.मी.चे अंतर एका दिवसात पार करतात. हमिंग बर्ड तीन ते सात वर्षे जगू शकतात. पक्ष्यांमध्ये एक गोष्ट मी पाहिली आहे की, यांचे वय झाल्यानंतर त्यांची सुद्धा पिसे गळू लागतात, त्यांच्या पंखांमधली उडण्याची क्षमता कमी होते, त्यांची शारीरिक चपळता कमी होते त्यामुळे त्यांना अन्न शोधण्यास खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा वृद्ध पशुपक्ष्यांची काळजी कोण घेणार? मग त्यांना मृत्यूच्या सामोरे जावेच लागते किंवा त्यांची शिकार होते. किमान मानव एकमेकांची काळजी घेऊ तरी शकतात.
या ६१ सें.मी. ते ९२ सें.मी.ची कागद कात्रणाची कलाकृती जेव्हा मी करावयास घेतली, तेव्हा त्यांच्या इंद्रधनू नाजूक पंखांनी मला आकर्षित केले. यांचे पंख बनवताना एक लक्षात आले की, कमीत कमी दोन इंचाचा हा पक्षी. याच्या पंखांतील सर्व भाग, त्यांचे आकार, त्यांचे बदलणारे इंद्रधनू रंग हे सर्व सूक्ष्म कात्रणामध्ये होते जे डोळ्यांना दिसतही नव्हते. खूप आश्चर्य वाटत होते की, परमेश्वराची ही कोणती ऊर्जा आहे की, इतक्या सुंदर आणि सूक्ष्म कलाकृती पृथ्वीवर बनवल्या जातात? अद्वितीय सौंदर्य, चपळता, इंद्रधनुषी चमकदार सूक्ष्म पंख, छोटेसे शरीर, अंतहीन ऊर्जा, सतत होणारे मधुर गुंजन असे हे आनंदी, उत्साही आणि मंत्रमुग्ध करणारे पक्षी. या पक्ष्यांना पाहताना आपण आपले सारे दुःख, कष्ट विसरून जातो. मन आल्हाददायक, उत्साही आणि आनंदित होते.

मानवाने प्रगतीच्या नावाखाली गर्द जंगलात सुद्धा वास्तव्य वाढवले आणि त्यासाठी जंगलतोड करणे, डोंगर फोडणे असा विध्वंस करून निसर्गाचा आनंद घेणाऱ्या संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या या जीवांचे वास्तव्य धोक्यात आणले. महत्त्वाचं म्हणजे मानवाला त्याची जाणीव सुद्धा नाही. शिवाय असे हे पक्षी कमी होण्याची कारणे म्हणजे इतर पक्ष्यांना, किटकांना त्यांचे अन्न न मिळाल्यामुळे ते यांची शिकार करत आहेत. जोडीला प्रदूषण आहेच. परिणामी अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा अन्न-पाण्यावाचून अंत होत आहे. कुठेतरी आता हे सर्व थांबले पाहिजे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -