Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजएक दिवा अवयवदानाचा

एक दिवा अवयवदानाचा

अन्नदानप्रमाणे देहदान करणे याविषयी अधिकाधिक प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया, असा जर विचार मनात आणला, तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील. अवयवदान ही राष्ट्राची गरज लक्षात घेता त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरिता अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

  • विशेष : सुरक्षा घोसाळकर, पवई, मुंबई

एखाद्याला आयुष्याची भेट देणे किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करणे म्हणजे दान होय. दान हे नेहमी सत्पात्री व गरज असणाऱ्या व्यक्तींना दिले पाहिजे. कर्णाने दिलेले कवचकुंडलाचे दान, शिबी राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मांस काढून दिले. धर्मग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे. प्रामाणिकपणे, शुद्ध अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते. वय, जात, रंग किंवा धर्म यातील समानतेचे दान म्हणजेच अवयवदान.

अवयव दान करण्यापूर्वी आपल्याला अवयवांचे महत्त्व जाणून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही जबाबदारी पार पाडणे अत्यावश्यक आहे. सुदृढ शरीर ही निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे. विश्वस्ताच्या भूमिकेतून योग्य पद्धतीने तिचा सांभाळ करून ही संपत्ती आपल्या पश्चात अनामिक वारसांना हस्तांतरित करायची आहे. शरीर दिव्य आहे. त्या दिव्यत्वाचा प्रवास आपल्याकडून दिव्यांगांकडे झाला पाहिजे. शरीराची उपासना करून अवयवरूपी घटकांची सेवा केली पाहिजे. शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक केला पाहिजे. शरीर ईश्वर स्वरूप आहे, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. ज्ञानेंद्रियांची रचना अतिसूक्ष्म पद्धतीने वर्णन करायचे ठरवले, तर मोठा प्रबंध तयार होईल. मानवी शरीर हे एक गूढ आहे. संशोधकांना शरीराचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही. मानवी शरीराची रचना अद्भुत आहे. हिराॅफिलस या ग्रीक अभ्यासकांनी शरीर रचना शास्त्राचा पाया घातला. त्यांचे सहकारी एरासिस्ट्राटस यांनी त्यावर अधिक संशोधन केले त्यातून शरीरक्रिया विज्ञान शाखेचा जन्म झाला.

आपल्या शरीरात खास शक्ती आहेत. आपल्या पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड ब्लेडलाही पचवू शकते. शरीरातील व्हेन्स (नसा) आणि कोशिका जोडल्या तर याची लांबी जवळपास ९७ हजार किलोमीटर होईल. मनुष्याचे हृदय दिवसभरातून १ लाख वेळेस धडकते. त्याच्या पम्पिंग प्रेशरने रक्त ३० मीटर उंच जाऊ शकते. मनुष्याचा मेंदू १ पेटा बाईट मेमरी स्टोरेज करू शकतो. १८ वर्षांपर्यंत मेंदूची वाढ १०० टक्के होते.

जन्माच्या वेळी शरीरात २७० हाडे असतात. वयस्क होईपर्यंत काही हाडे जुळून २०६ हाडे राहतात. मनुष्याची हाडे सिमेंट काँक्रीटपेक्षाही चारपट अधिक कडक असतात. कवटी २९ वेगवेगळ्या हाडांपासून तयार झालेली असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सॅरीटोनिन वाढते. म्हणजेच प्रेमही मेंदूमध्ये वाढणाऱ्या
केमिकलमुळे होते.

आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला १ कोटी रेड सेल्स तयार होतात आणि नष्टही होतात. कोणताही रक्तप्रवाह नसल्यामुळे डोळ्यांतील बुबुळ आहे तेवढेच राहतात. बुबुळ ५७६ पिक्सल असतात. त्यामुळे डोळे जवळपास १ कोटी रंग ओळखू शकतात. कान आणि नाक अतिशय मंदगतीने मृत्यूपर्यंत वाढत जाते. आपले वजन अर्धा किलो वाढले, तर ११ किलोमीटर लांब व्हेन्स वाढतात. मेरूदंडाच्या (स्पायनल काॅर्ड) माध्यमातून मेंदूला सूचना प्राप्त होतात. कधीकधी मेरूदंड स्वतःच निर्णय घेतो. जसे पायात काटा मोडला, तर आपण लगेच पाय वर करतो. आपल्या त्वचेच्या एक इंच भागात जवळपास ३ कोटी बॅक्टेरिया असतात. अनेक बॅक्टेरिया फायदेशीर असतात.

मनुष्याचे नाक ५० हजार प्रकारचे गंध ओळखू शकते. जे फुप्फुसासाठी एअरकंडिशनचे काम करते. एका डोक्यावर जवळपास १ लाख केस असतात. दिवसाला १०० गळाले तरी त्या ठिकाणी दुसरे केस येतात. एका वयस्क व्यक्तीच्या शरीरात साडेपाच लिटर रक्त असते जे नसांमधून ४०० तास प्रति किलोमीटर वेगाने वाहते म्हणजेच दिवसभर ९५०० किलोमीटर अंतर पूर्ण करते.

अशा अद्भुत शरीराचा खजिना निसर्गाने आपल्याला बहाल केलेला आहे. डोळे, नाक, त्वचा, जीभ, कान या ज्ञानेंद्रियांचे इष्टतम कार्य महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांचे आरोग्य राखणे अत्यावश्यक आहे. आपल्या इंद्रियांची काळजी घेतल्याने आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते. त्यासाठी निरोगी पौष्टिक आहार घेणे, अवयवांची स्वच्छता राखणे, स्वतःला शारीरिकरीत्या सक्रिय ठेवणे महत्त्वाचे ठरते. हे कुबेराचे धन आपल्याला जन्मजात प्राप्त असल्याने माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे अभिप्रेत आहे. आपल्या अंतर्मनाशी ठरवून ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झालेले असतात, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान नवसंजीवनी देऊ शकते. डोळे, यकृत, हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, आतडे, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, त्वचा, हाडे, हृदयाच्या झडपा, नसा, कॉर्निया, कानाचे ड्रम या अवयवांचे ६ ते ७२ तासांत पुनरोपण होते. एक दाता निरोगी अवयवाने आठ जणांचे जीव वाचवू शकतो.

भारतात प्रत्येक वर्षी ३ ऑगस्ट रोजी शासकीय आणि निमसरकारी संस्थांमध्ये अवयवदान दिन साजरा केला जातो. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, पंजाब ही देशातील सर्वाधिक अवयवदान देणारी राज्य आहेत. एखादा रस्ता अपघात झाल्यास केवळ इस्पितळात मृत्यू पावलेल्यांच्या शरीराचे अवयव दान करता येते. कर्करोग, एड्स, संसर्ग किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त लोक अवयव देऊ शकत नाहीत. अवयवदान ही प्रक्रिया एखादी व्यक्ती जिवंत असताना किंवा तिच्या उत्तराधिकाऱ्यांच्या संमतीने ती मृत्यू पावल्यावर केली जाते. भारतात अवयवदान प्रक्रिया केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पार पडते. अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था काम करते. या संस्थेच्या www.notto.nic.in या सर्वोच्च संकेतस्थळावर स्वेच्छेने अवयवदाता म्हणून नोंद करता येते. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकते. अवयवदान करताना पैसे घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी १ ते २ वर्षांची शिक्षा, तर ५ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

जिवंत असताना आपण एक किडनी, स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा एक छोटा भाग दान करू शकतो. याला स्वॅप ट्रान्सप्लांट म्हटले जाते म्हणजेच दोन विविध कुटुंबांतील व्यक्तींमध्ये करण्यात आलेले अवयवदान. ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट १९९४ नुसार स्वॅप ट्रान्सप्लांटला कायदेशीर मान्यता आहे. अवयव प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी रक्त आणि ऊती जुळाव्या लागतात.

विविध आघात, अपघात, युद्ध, आगी, भूकंप अशा विविध कारणांमुळे अवयवदानाची आवश्यकता भासते. त्वचादान करण्यासाठी भारतात पहिली त्वचापेढी मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात २००० साली सुरू झाली. घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सहा तासांपर्यंत डोळे व त्वचा यांचे दान करता येते. गरजू रुग्णाचे वय, रक्तगट, त्याच्या आजाराची तीव्रता, प्रतीक्षा यादीनुसार सर्वाधिक गरजू रुग्णाला अवयव दान केला जातो. परस्परांचे नाव व पत्ता गोपनीय ठेवला जातो.

देहदान केल्यास मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयोगात येतो. मृत व्यक्तीत हृदयक्रिया बंद पडल्याने नेत्र आणि त्वचा वगळता इतर अवयवांना रक्त पुरवठा थांबल्याने हे अवयव प्रतिरोपणासाठी बाद ठरतात.

अपघाताने डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छ्वास कायमस्वरूपी बंद झाल्यास त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेड) झाल्याने त्या व्यक्तीचे नेत्र, यकृत, हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, आतडे, मूत्रपिंड, त्वचा, हृदयाच्या झडपा, कानाचे ड्रम या अवयवांचे दान होऊ शकते. भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या गोष्टींना मान्यता दिली आहे. अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक नातेवाइकांना अंतिम विधीकरिता परत केले जाते.

अवयवदानाला संमती दिल्यानंतर त्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा तसेच इतर वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाइकांना करावा लागत नाही. व्यक्ती मृत झाली तरी त्याचे डोळे दोन ते सहा दृष्टीहीनांना नवजीवन देण्याचे महानकार्य करतात. आपल्या अवयवदानाची माहिती जवळच्या नातेवाइकांना देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या संमतीनेच अवयवदानाचे महान कार्य पूर्णत्वास जाऊ शकते.

देहदान करणे ही आधुनिक चळवळ सुरू होणे आवश्यक आहे. अन्नदानप्रमाणे देहदान करणे याविषयी अधिकाधिक प्रचार, प्रसार करणे आणि जनतेने त्यासाठी सकारात्मक होणे, ही आधुनिक भारताची ओळख निर्माण व्हावी ही काळाची गरज वाटते!

प्रत्येकाने संकल्पपूर्वक कटिबद्ध होऊन अवयवदानरूपी दिव्याने गरजू रुग्णांच्या आयुष्याला तेजोमय करूया. जय हिंद!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -