Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीDhangar vs OBC : ओबीसी मेळाव्याशी धनगर समाजाचा संबंध काय?

Dhangar vs OBC : ओबीसी मेळाव्याशी धनगर समाजाचा संबंध काय?

मूळ मागणीपासून समाजाला भरकटवण्याचे षडयंत्र; नेत्यांनी समाजाची दिशाभूल करू नये

अखिल भारतीय धनगर विकास परिषदेचा जाहीर सवाल

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी मेळाव्याची राज्यात चर्चा असली तरी या ओबीसी मेळाव्यात धनगर समाजाच्या नेत्यांनी सहभाग घेऊन समाज ओबीसी चळवळीशी एकनिष्ठ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी धनगर समाजाने या मेळाव्याला उपस्थित असणे हाच आता कळीचा मुद्दा (Dhangar vs OBC) बनला असून अखिल भारतीय धनगर विकास परिषदेने धनगर समाजाचा ओबीसी चळवळीशी काय संबंध आहे? धनगर समाजाचे नेते या मेळाव्याला कसे उपस्थित राहू शकतात? असे गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

दैनिक प्रहारने याविषयी अखिल भारतीय धनगर विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता खेमनर यांच्याशी चर्चा केली असता खेमनर यांनी काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

दैनिक प्रहारशी बोलतांना दत्ता खेमनर म्हणाले, अनुसूचित जमात म्हणून धनगर समाजाला मान्यता देऊन आदिवासी समाजाच्या सोयी सवलती मिळाव्यात, ही धनगर समाजाची मूळ मागणी आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या ओबीसी आरक्षण चळवळीशी धनगर समाजाचा सुतराम संबंध नाही. धनगर समाज ओबीसी नाहीच, मग नेते समाजाची दिशाभूल करून समाजाला ओबीसी प्रवाहात का आणू इच्छित आहेत, हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे. हे निव्वळ राजकारण आहे. समाजाची दिशाभूल करून मूळ मागणी पासून समाजाला दूर नेण्याचे हे षडयंत्र तर नाही ना? याविषयी समाजासह नेत्यांनी मंथन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

भुजबळांना जरांगेंवर टीका करण्याचा अधिकार नाही

अंबडच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टिकेवर देखील खेमनर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, भुजबळांनी हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नये. मनोज जरांगे यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही. मराठा समाजाचे कुणबीतून ओबीसी आरक्षण हे आंदोलन रास्तच आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवे. त्यांचा तो अधिकार आहे. कारण कुणबी ओबीसी आहेत, असा दावा त्यांनी केला.

धनगर समाजाने सावध व्हावे

धनगर समाजाच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या सोबत ओबीसी विचाराच्या व्यासपीठावर बसणे हा समाजद्रोह आहे, अशा आशयाचे मत व्यक्त करून नेत्यांच्या या भूमिकेमुळे धनगर समाजाचे आंदोलन भरकटण्याची भीती आहे. नव्हे हेच राजकीय षडयंत्र असू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ही गंभीर चाल असू शकते हे लक्षात घेऊन धनगर समाजाने ओबीसीसोबत वाहवत न जाता आपल्या मूळ मागणीसाठी संघर्ष करावा, असा सावध सल्ला त्यांनी दिला.

धनगर समाजाचे नेते आणि धनगर समाजाला वजा करून छगन भुजबळ यांनी सभेचे मैदान भरून दाखवावे, असे आव्हानही दत्ता खेमनर यांनी दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -