Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सकरिअरचे पर्याय

करिअरचे पर्याय

  • करिअर : सुरेश वांदिले

दहावीनंतरच करिअरची दिशा स्पष्ट होते असे समजण्याचे काही कारण नाही. १०वीनंतर कोणत्या ज्ञानशाखेत म्हणजे वाणिज्य-विज्ञान-कला यामध्ये जायचे का? हे ठरवता येऊ शकते. बारावीनंतर अभियांत्रिकी – वैद्यकीय – डिझाइन – फॅशन तंत्रज्ञान- व्यवस्थापन – विधी – संशोधन आदी विविध करिअरचे पर्याय उपलब्ध होतात. पदवीनंतर याच शाखांमधील पदव्युत्तर पदवी किंवा इतर विषयातील पदव्युत्तर पदवी (उदा. एमबीए-मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/मास्टर ऑफ फॅशन टेक्नालॉजी किंवा कलाशाखेतील विषय इत्यादी), पदव्युत्तर पदवीनंतर संशोधनाकडे वळता येऊ शकते.

शाखा एकिकडे… करिअर दुसरीकडे!

बारावीनंतर ज्या ज्ञानशाखेला प्रवेश घेतला त्याच शाखेत करिअर होईल, असे काही ठामपणे सांगता येत नाही. इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग करूनही पहिले प्लेसमेंट ज्या ज्ञानशाखेशी फारसा संबंध येत नाही, अशा संगणक शास्त्राशी संबंधित काम देणाऱ्या कंपनीत मिळते. आयआयटीसह इतर संस्थांमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी एमबीएचा मार्ग पकडतात. बऱ्याच अभियंत्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा मार्ग खुणावू लागतो. बरेच जण अखिल भारतीय आणि राज्य प्रशासकीय सेवेसाठी झटून तयारीला लागतात. अगदी एमबीबीएस झालेले विद्यार्थी हा मोह आवरू शकत नाहीत. ज्या विषयात इंजिनीअरिंगची पदवी घेतली, त्या विषयापेक्षा दुसऱ्या विषयात एमएस (मास्टर ऑफ सायन्स) करण्यासाठी विद्यार्थी परदेशात जातात. सैन्यदलातील अधिकारी पदासाठीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी प्रयत्न करतात. याचा अर्थ असा की, बारावीनंतरच करिअरची दिशा ठरते आणि त्यात काही बदल होत नाही, असे अजिबात समजायचे कारण नाही.

आवाका समजून घ्या…

बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आवाका समजून घेतला, पालकांनीही मुलांचा आवका समजून घेतला, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आवडीनिवडीच्या किंवा कलाचा लंबक सर्वाधिक कोणत्या बिंदूवर थांबतो हे प्रामाणिकपणे जाणून घेतले, तर बऱ्याच बाबी सुलभ होऊ शकतात.

सर्वांनाच मनासारख्या ज्ञानशाखेत अभ्यास करायला मिळेलच असे नाही. विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या आणि उपलब्ध जागा यांचे प्रमाण लक्षात घेता, तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे नैराशाला निमंत्रण देण्यासारखेच ठरते.

सर्वांना सध्या चांगल्या आणि दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान या शाखांमध्ये अग्रक्रमाने प्रवेश हवा आहे. पण ते शक्य होणार नाही ना! केवळ या शाखांमध्ये प्रवेश घेतल्यांना रोजगाराची संधी विनासायास मिळते किंवा मिळू शकते म्हणून आपली क्षमता नसतानाही तिकडे धावायला गेलो, तर दम लागणार आणि तोंडाला फेसही येणार. हे असे घडणार हे माहीत असताना, अशी कृती करणे हे शहाणपणाचे ठरत नाही.

शिवाय, प्रवेश मिळणे हा एक भाग झाला, तो महत्त्वाचाही आहे. पण त्यानंतर संबंधित विषयाच्या ज्ञान ग्रहणाचे काय? इथे कस लागतो आणि विकेटही जाते. ही बाब इतकी स्वयंस्पष्ट झाली आहे. भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ ते २५ टक्क्यांपर्यंतचेच विद्यार्थी अभियांत्रिकी स्नातक किंवा पदवीधर म्हणून घेण्यास पात्र ठरतात असे बऱ्याच सर्वेक्षण आणि अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. तज्ज्ञ मंडळीही असेच मत व्यक्त करतात. त्यामुळेच शंभरातील २० ते २५ टक्के अभियांत्रिकी पदवीधर हे रोजगारक्षम असतात. त्यांनाच संधी मिळते. असेच विद्यार्थी पुढे जातात. बाकीच्यांना रडत-रखडत वाट चोखाळावी लागते. ही वाट खडतर असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज भासू नये.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यावा, पण त्यांनी स्वत:ला रोजगारक्षम बनवणे आवश्यक आहे, तरच तो सध्याच्या अत्यंत स्मार्ट आणि थकवून टाकणाऱ्या स्पर्धेच्या युगात टिकू शकेल. रोजगारक्षम होणे याचा अर्थ जे काही तीन ते चार वर्षांत ज्ञान ग्रहण केले त्याचा प्रत्यक्ष प्रभाविरीत्या वापर करता येणे. विद्यार्थ्याने फॅशन डिझाइनच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, पण पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही त्याला कपड्यांचा पोतही ओळखता येत नसेल किंवा कात्रीने कापड कापणे जमत नसेल, तर त्याला कोण नोकरी देणार किंवा हा असा विद्यार्थी स्वत:च्या पायावर कसा उभा राहणार? पत्रकारिता/ जनसंवाद/ जनसंपर्क/ जाहिराती/ इलेक्ट्रॉनिक माध्यमे या क्षेत्रांमध्ये सध्या विपुल संधी आहेत. मात्र पदवीच्या काळात, भाषा- व्याकरण- सादरीकरण- आवाज – तांत्रिक कौशल्य – चौफेर वाचन याकडे पाठ फिरवलेल्या किंवा टाइमपास म्हणून बघणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार? समजा संधी मिळाली, तर ती टिकून कशी राहणार? या क्षेत्रात पाऊल टाकता क्षणापासूनच ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशी स्थिती असते. ही बाब सर्वच क्षेत्रांसाठी लागू पडते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -