जळगाव : माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चार कोटीची खंडणी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नामुळे ते याआधीही चर्चेत आले होते.
राज्यात एकत्र असलेले एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना गिरीश महाजन यांच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा खडसेंच्या सांगण्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर एडवोकेट प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन झाले होते या ऑपरेशन मध्ये अनेक खुलासे बाहेर पडले होते.
यानंतर एडवोकेट प्रवीण चव्हाण पुन्हा नवीन वादात सापडले आहेत. एडवोकेट चव्हाण यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात तेजस रवींद्र मोरे, ३४, प्लॉट नंबर ३, जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव यांनी जबाब दिलेला आहे. त्याच्यावर दबाव आणून ऍड. प्रविण चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण व विलास आळंदे, निखिल आळंदे, स्वप्नील आळंदे यांना हाताशी धरुन आपल्याकडे चार कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली व त्याचबरोबर जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार तेजस मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.