- महेश पांचाळ : गोलमाल
वैभव शहा. वय ३०. शिक्षण जेमतेम बारावी. दिसायला हँडसम. बोरिवलीत राहणारी नूपुर मेहता ही तरुणी लग्नासाठी चांगल्या वराच्या शोधात होती. तिने मॅट्रिमोनी साइटवर आपले प्रोफाईल तयार केले होते. १ नोव्हेंबर रोजी वैभव शहा (वय ३०) याने नूपुर यांना रिक्वेस्ट पाठवली. नूपुर या लग्नासाठी वराच्या शोधात असल्याने त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. पुढच्या दिवशी वैभवने महिलेला लग्नाची मागणी घातली. वैभव शहाने तिला तो हिरे व्यापारी असल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिका आणि मुंबईत त्याचा व्यवसाय असल्याचीही माहिती दिली होती. त्यानंतर शहाने नूपुरला सांगितले की, तिने त्याच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवावे. यामुळे तिला दोन दिवसांमध्ये दुप्पट पैसे मिळतील. हे पैसे लग्न धुमधडाक्यात करण्यासाठी कामाला येतील. नूपुरने वैभव शहावर विश्वास ठेवला आणि त्याला ऑनलाइन सात लाख रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर वैभवने आपले प्रोफाइल साइटवरून डिलिट केले. तसेच मोबाइल क्रमांक बंद करून ठेवला. एक-दोन दिवस तिला कळलेच नाही की आपल्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला. मोबाइल स्वीच ऑफ आल्याने तिला कळाले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर नूपुरने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन आणि बँक खात्याच्या क्रमांकावरून आरोपीचा पत्ता शोधून काढला. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, सायबर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांच्या देखरेखीखाली अहमदाबाद येथे झालेल्या ऑनलाइन व्यवहाराचा छडा लावला. पीएसआय पाटील अहमदाबाद येथे पोहोचले आणि शहा याला अटक केली.
पोलिसांनी अहमदाबादमधून आरोपी वैभव शहाला पकडल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. मुळात त्याचे खरे नाव झोरीन अनिल सोलंकी असल्याची माहिती मिळाली. तो ३७ वर्षांचा असून अहमहाबादचा रहिवासी आहे. मात्र मॅट्रिमोनी साइटवर प्रोफाइलवर स्वत:चे वैभव शहा हे खोटे नाव दिले होते. या प्रकरणी सोलंकीचा साथीदार पिनाकिन नवीतभाई पटेल (वय ४३) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
लग्नाचे आश्वासन देऊन नूपुरला सात लाख रुपयांचा गंडा घातला, याची त्याने कबुली दिली. तसेच आरोपी सोलंकी गोव्यामध्ये कसिनोमध्ये पैसे उडवत असताना पोलिसांनी त्याला २०२१मध्ये अटक केली होती. सोलंकी हा १२वी पास आहे. तो महिलांना शेअर मार्केट ट्रेडर असल्याचे सांगायचा आणि पैसे गुंतवण्याचा सल्ला द्यायचा. तो स्वत:चा फोटो साइटवर टाकायचा. दिसायला चांगला असल्याने अनेक महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायच्या. सोलंकी आणि पटेल यांनी विविध वैवाहिक वेबसाइटवर अनेक प्रोफाइल तयार केले आणि त्याच पद्धतीचा वापर करून किमान १५ महिलांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या बळींमध्ये रु. २१ लाखांची फसवणूक झालेल्या गोव्यातील एक डॉक्टर आणि काही वर्षांपूर्वी रु. २० लाखांची फसवणूक झालेल्या अंधेरीतील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. सोलंकी आणि पटेल या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घोटाळ्याची संपूर्ण व्याप्ती निश्चित करण्यासाठी आणि आणखी किती महिलांना कसे लक्ष्य केले गेले आहे, हे शोधण्यासाठी पोलीस सध्या इतर पीडित महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
maheshom108@gmail.com