पोलिसांची लाठी थांबेना! कंटेनर चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पिंपळनेर : त्या बिचा-याला का मारू राहिले…? या एका वाक्यामुळेच कंटेनर चालकाला पोलिसांकडून होणारी मारहाण थांबली. एकीकडे रस्त्यावरील नागरिकांची मोठ्याने मदतीसाठी भावनिक साद तर दुसरीकडे शिस्तीचे धडे शिकविणा-या खाकी वर्दीतील पोलिसांकडून महामार्गावर कंटेनर चालकाला लाठीने बेदम मारहाण.. अनं ही मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल….
गरजू, सर्वसामान्य, पीडित, अन्यायग्रस्त जेव्हा पोलिसांकडे दाद मागतात तेव्हा प्रामाणिक पोलीस आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून न्याय देण्याचा प्रयत्न करतात व असे पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी कौतुकास पात्र ठरतात. तर भ्रष्टाचाराची कीड व अहंकार अंगी बाळगणा-या काही अधिकारी व कर्मचा-यांमुळे खाकीला ‘डाग’ लागतो.
ज्या रस्त्यावर कंटेनर चालकाला मारहाण केली जात आहे त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धुळे-सुरत बायपास असे नमुद करण्यात आले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे…? कंटेनर चालकाचा गुन्हा काय..? मारहाण करणारे पोलीस कर्मचारी कोण आहेत..? कोणत्या पोलीस ठाण्यातील आहेत..?याबाबत कुठलाही दुजोरा मिळालेला नाही किंवा व्हिडीओची पुष्टी झालेली नाही. पोलिसांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दैनिक प्रहार देखील या व्हायरल व्हिडीओला दुजोरा देणार नाही.
मात्र असे असले तरी कंटेनर चालकाला पोलीस कर्मचारी लाठीने जोरदार मारहाण करीत आहे. तर दुसरा कर्मचारी या चालकाला कानशिलात चापट मारत आहे. ट्रॅफिकचे इतर २ कर्मचारी देखील घटनास्थळी उभे असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. तर रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेले नागरिक मारू नका यासाठी भावनिक साद देत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर “जनतेचे रक्षकच झाले भक्षक” अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता पोलीस प्रशासन या व्हिडिओची पुष्टी करून कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक कर्तव्य बजावणारे पोलीस दलातील कर्मचारी आजही सर्वत्र पहावयास मिळतात मात्र असे असले तरी काही मुजोर आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा निश्चितच मलिन होते. अनेकदा जेथे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हवे तेथे न दिसता भलत्याच ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात आणि वाहने अडवून त्रास देण्याचे प्रकार घडतात.
एकूणच बेशिस्त वाहतूक, नियमबाह्य वाहतूक, विनापरवाना वाहतूक, अवैध वाहतूक यावर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र केवळ वाहनचालकांना धाक दाखवून नाहक त्रास देण्याचे प्रकार थांबविले पाहिजे. ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेला दृष्टिकोन अधिकच बळकट होईल.
“सदर व्हायरल व्हिडिओ बाबत योग्य ती चौकशी सुरू असून यात दोषी आढळणा-यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल” – संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक, धुळे