मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) (TCS – टीसीएस) या देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने एकीकडे १७,००० कोटी रुपयांच्या बायबॅकसाठी २५ नोव्हेंबर ही तारीख ठरवली आहे. तर दुसरीकडे तब्बल २००० हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीची नोटीस पाठवल्याने कर्मचा-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर टीसीएसने आपल्या निर्णयात कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक केले होते. त्यानंतर आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने त्यांच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या आत बदली केलेल्या संबंधित ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहे, अशी माहिती आयटी कर्मचाऱ्यांची संघटना कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने दिली आहे.
मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यांत कर्मचाऱ्यांना ठराविक ठिकाणी रुजू व्हावे लागेल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. असे न केल्यास कंपनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकते. याबरोबरच कर्मचाऱ्यांचा प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी करणार असल्याचेही या मेल पत्रात म्हटले आहे.
कंपनी योग्य माहिती न देता एका शहरातून दुसऱ्या शहरात कर्मचाऱ्यांची बदली करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आयटी युनियनने टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
युनियनचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले की, कंपनीने हा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
तर कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा एक नियमित निर्णय आहे, जो बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या फ्रेशर्ससाठी लागू केला गेला आहे, परंतु आता त्यांना वास्तविक प्रकल्पांवर तैनात केले गेले आहे. ते म्हणाले की, २००० पैकी बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी गेले आहेत, मात्र तरीही १५० ते २०० कर्मचारी तसे करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
दरम्यान, टीसीएसने ११ ऑक्टोबर रोजी १७,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बायबॅकमध्ये कंपनी ४.०९ कोटी (४,०९,६३,८५५) शेअर्स खरेदी करेल, जे एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या १.१२% आहे. २०१७ नंतर कंपनीचा हा पाचवा बायबॅक असेल. कंपनीने बायबॅकची किंमत ४,१५० रुपये निश्चित केली आहे.
टीसीएसचे शेअर्स बुधवारी ३,४०८.६० रुपयांवर बंद झाले. बायबॅकची घोषणा झाल्यापासून, टीसीएसचे शेअर्स ३.९ टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या टीसीएसमध्ये प्रवर्तकांचा वाटा ७२.३०% आहे.
टीसीएस सहा वर्षांत पाचव्यांदा आपले शेअर्स बाय बॅक करणार आहे. यापूर्वी, कंपनीने २०१७, २०१८, २०२० आणि २०२२ मध्ये बायबॅक केले होते. आतापर्यंत ६६ हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते.
आता कंपनी १७ हजार कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये, कंपनीने १६ हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. यानंतर, जून २०१८ मध्ये, १६ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सपैकी १८ टक्के शेअर्सची खरेदी परत करण्यात आली आणि ऑक्टोबर २०२० मध्येही १६ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सपैकी १० टक्के शेअर्स प्रीमियमने खरेदी करण्यात आले. यानंतर, जानेवारी २०२२ मध्ये, कंपनीने १७ टक्के प्रीमियमवर भागधारकांकडून १८ हजार कोटी रुपयांचे शेअर्स परत विकत घेतले.