
बुलढाण्यात ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिली धडक
बुलढाणा : गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी देखील एक भीषण अपघात (Buldhana Accident) झाला. काल रात्री बाराच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने (Travels) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ हा अपघात घडला. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात मरण पावलेल्या तीनही व्यक्ती तरुण होत्या. भाऊबीजेच्या दिवशी त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे (राहणार कल्याण) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल (बुधवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.