- जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर हा असा विषय आहे की त्याचा नीट स्टडी केला, अभ्यास केला, तर त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. तो एवढा शक्तिमान आहे की, आपण त्याला सर्वशक्तिमान म्हणतो. सूर्य, चंद्र सर्व त्याच्याच शक्तीने चालतात. एवढा विराट, अफाट, अचाट आहे, तरीसुद्धा त्याने कधीच घमेंड केलेली नाही. वास्तविक माणूस हा त्याचाच अवतार आहे. परमेश्वर एक पायरी खाली उतरला झाला तो माणूस. माणूस एवढा मोठा आहे की, माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केली. इतकेच नव्हे, तर माणसाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी इतकी विलोभनीय आहे. तसे बघायला गेले, तर माणसाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी ही परमेश्वराच्या सृष्टीपेक्षा विलोभनीय आहे.
माणसे विमानाने उडतात, लिफ्ट मधून वरखाली येतात, मोबाइलवरून टेलिफोनवरून बोलतात, हे निरनिराळे शोध पहिले, तर माणसाने निर्माण केलेली ही प्रतिसृष्टी किती आश्चर्यकारक आहे. वांद्रे-वरळी पूल हा काय पूल आहे! मोठेमोठे पूल बांधतात, मोठेमोठे मॉल बांधतात, मोठ्यामोठ्या इमारती बांधतात, मोठेमोठे टॉवर बांधतात. ही सगळी प्रतिसृष्टी आहे. माणूस केवढा मोठा आहे पण तोच माणूस किती छोटा होतो, किती हलकट होतो, किती नीच होतो, किती दुष्ट होतो, लोकांचे खून करतो, मारामारी दहशतवाद हे सगळे पहिले, तर याला माणूस कसे म्हणायचे? एकमेकांची डोकी फोडतात. आम्हाला ढेकूण मारायचे म्हटले, तरी दहा वेळा विचार येतो. डास मारायचा म्हटला, तरी दहा वेळा विचार येतो. हे माणसे कशी मारतात? तेसुद्धा आश्चर्य म्हणजे सुपारी घेऊन खून करतात. ही माणसे नाहीत हे, तर राक्षस. पैशासाठी तुम्ही वाट्टेल ते करता. ज्याचा खून करता त्याचे आई-वडील, त्याची बायकामुले यांचा जराही विचार करत नाही. पूर्वीच्या काळी राक्षस होते असे आपण म्हणतो. ही माणसे म्हणजे राक्षसच आहेत. राक्षसांना मारण्यासाठी रामावतार झाला. राक्षसांना मारण्यासाठी कृष्णावतार झाला, तरी हे राक्षस गेले नाहीत. पैशासाठी खून करणारे, सुपारी घेऊन खून करणारे ही माणसे नव्हेत, तर ते राक्षसच आहेत. हे राक्षस पूर्वीही होते व आजही आहेत हे मला सांगायचे आहे. पूर्वी रामावताराच्या वेळी सूर्यचंद्र होते तेच आजही आहेत. पूर्वीच्या काळी जे होते ते आजही आहे.
आपण म्हणतो लोकांचा उद्धार करण्यासाठी देवांचे अवतार झाले, प्रेषित झाले. लोकांचा उद्धार करण्यासाठी एवढे संत झाले, पंत झाले, तरी जग आहे तिथेच आहे. उलट आता अधिकच बिघडलेले आहे. किती अवतार झाले, किती संत झाले, किती ऋषीमुनी झाले, तरी हे जग सुधारण्याऐवजी अधिकच वाईट होत चाललेले आहे, विनाशाकडे चाललेले आहे. प्रतिसृष्टी निर्माण करणारा माणूस इतक्या नीच अवस्थेपर्यंत जावू शकतो. याला कारण त्याला देवाचा विसर झाला. देवाचा विसर झाला की, सर्व वाईट होते व देवाचा आठव झाला की सर्व चांगले होते. देवाचा आठव करा, देवावर प्रेम करा, देवाची भक्ती करा असे का सांगतात? कारण देवाचे स्मरण जेवढे अधिक कराल तेवढे जीवन अधिक सुधारत जाईल.