Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यKonkan Local Shopkeepers : कोकणात स्थानिक व्यापारी हरवतोय ...!

Konkan Local Shopkeepers : कोकणात स्थानिक व्यापारी हरवतोय …!

  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील कोकणप्रांतातून नोकरी-व्यवसायासाठी फार पूर्वीपासूनच मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरात तरुण जात आले आहेत. कोकणात तरुण रोजगाराच्या संधी नाही म्हणून बाहेर जातोय. कोणताही प्रकल्प कोकणात यायचा झाला की विरोध हा ठरलेलाच असतो. तरुणांच्या बेरोजगारीपेक्षा राजकारण महत्वाच होतं. हे राजकारण वरचढ होतय. यामुळे शिकलेले तरुण नोकरी निमित्ताने पुणे, मुंबईच्या शहरांची वाट धरतात. इथला तरुण इथेच थांबू शकेल ही व्यवस्था आणि अवस्थाही नाही. या दुरवस्थेचा विचार करायला कोणालाच वेळ नाही. कोकणात जवळपास सर्वच व्यवसायात परप्रांतीय जागोजागी दिसत आहेत. कोकणातील बाजारपेठांमध्ये किराणा व्यवसायातही मारवाडी आले आहेत. परप्रांतीयांबद्धल मनात कोणताही द्वेषभाव न ठेवता आपली वडिलोपार्जित असलेली दुकाने, व्यवसाय गुजराती, मारवाडी, बिहारी भैया यांच्याकडे दिला गेला आहे. परप्रांतीय कोकणात येऊन व्यवसाय करतात. म्हणून कोणी गळा काढण्याचा किंवा विरोध करण्याचे काहीच कारण नाही.

व्यापार, व्यवसायासाठी आवश्यक असणारा संयमीपणा आपल्याकडे आहे कुठे? व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन-चार-सहा महिने होणारं नुकसान सहन करण्याची आपली मानसिकता नाही. व्यवसाय सुरू केल्याबरोबर आपल्या व्यवसायाकडे गर्दीच झाली पाहिजे. हा आपल्या मनातला अट्टाहास आपणाला पुढे जाऊ देत नाही. उदाहरणच घ्यायच झालं, तर कोकणातील महामार्गावर आडवळणांवर उसाचा रस विकणारे गाडे दिसतात. उसाचा रस विकणारे उत्तर प्रदेश-बिहारकडचे तरुण आहेत. जेव्हा ते एखाद्या मार्गावर उसाच्या रसाचा गाडा उभा करतात, तेव्हा ती व्यवसायाची जागाही नसते. दोन-तीन महिन्यात त्या मार्गावरून जाणारे वाहनचालक प्रवासी हमखास ‘अरे, भैय्या दो रस देना. अद्रक, लिंबू जादा डालना’ म्हणत रस पितात. नंतर-नंतर त्या मार्गावरून जाणाऱ्यांना हमखास त्याची सवयच होऊन जाते आणि मग आपल्या कोकणातल्या माणसांच्या डोळ्यांत त्याचा उसाचा रगाडा भरतो आणि तो चर्चा करू लागतो. काय तो उसाचो गाडो चलता… खरं तर त्या व्यवसायामागे असणारी त्यांची निष्ठा, कष्ट करण्याची मानसिकता आणि बोलण्यातला लाघवीपणा यातलं आपल्याकडे काय आहे ? आजही आपली भाषा ‘होया तर घेवा नाय तर तसेच पुढे जावा.’ या अशा भाषेने आणि संयम नसल्याने आपले फार नुकसान केले आहे.

कोकणातील ज्यांच्यामध्ये स्वभावत: छान बोलणं, समोरच्याशी आदराने बोलणं हे सगळ जमलं ते यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले आहेत. कोकणातील कापड व्यवसायात गुजराथी, मारवाडी मोठ्या प्रमाणात आले आहेत. कोकणातील बाजारपेठांतून मोजकेच कापड व्यावसायिक स्थानिक आहेत. बाकी मोठ्या प्रमाणात या कापड व्यवसायात मारवाडी समाजाने बाजारपेठा काबिज केल्या आहेत. अगोदरच थोडा अधिक दर सांगून ग्राहकाने कमी करण्याचा हट्ट धरला की, थोडे पैसे कमी करण्याचा फंडा या परप्रांतीय व्यावसायिकांमध्ये आहे. आपल्याकडचा व्यापारी आमचा फिक्स रेटच्या वाक्यावर ठाम हे चूक आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही; परंतु यातून नुकसान कशाने होते? आपला फायदा कशात आहे? याचा विचारही कोकणातील व्यावसायिकांनी केला आहे. हार्डवेअरचा व्यवसाय तर पुर्णपणे गुजराती समाजाकडेच आहे. कोकणातील काही ठरावीक नाव घेण्यासारखे मोठे व्यावसायिक या व्यवसायात आहेत. काही वेळा परप्रांतीय व्यावसायिकांना आम्ही पाय ठेऊ देणार नाही. म्हणून व्यापाऱ्यांकडून घोषणा केल्या जातात. इथे पाय ठेवण्याचा विषयच नाही. कोकणातील बाजारपेठांमध्ये परप्रांतीय पाय ठेऊन नव्हे, तर पाय रोवूनच उभे आहेत. परप्रांतातून येणाऱ्या व्यावसायिकांना बाजारपेठेत व्यवसाय थाटण्यासाठी जागा कोणी दिल्या? स्वत:चे व्यवसाय बंद करून आपले व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपल्यापाशीच येऊन थांबतील.

भाजी, कपडे, फळ असा कुठलाही व्यवसाय घ्या. यात परप्रांतीयच व्यवसाय करताना दिसतील. सर्वच व्यवसायामध्ये व्यावसायिक स्पर्धा ही असणारच असणार! आपण परप्रांतीयांनी या व्यवसायात येऊ नये. इथे व्यवसाय करूच नये असे कोणालाच ठरवता येणार नाही. आमच्या बाजारपेठेत सेल लावू नका, असे परप्रांतीयांना म्हणू शकत नाही. यापेक्षा आपल्या कोकणातील व्यावसायिकांनी ‘सेल’च्या पद्धतीनेही व्यवसायात उतरायला हवे. शेवटी दुकानात खरेदी करणारा ग्राहक, सेलमध्ये खरेदी करणारा ग्राहक ज्याला जिथे खरेदी करणं परवडेल तिकडेच तो खरेदी करणारच ना ! ऑनलाइन होणारं शॉपिंग कोण रोखू शकणार? लाखो रुपयांची उलाढाल या ऑनलाइन शॉपिंगमधून होत असते. व्यवसाय करायचाच असेल, तर स्पर्धेला सामोरे जावच लागेल. कोकणातील व्यावसायिकांनी खुप मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील. नाही तर एक दिवस कोकणातील बाजारपेठांनाही ‘गांधीनगर’प्रमाणे काहीतरी नामकरण द्यावं लागेल. बेकरी व्यवसायात बहुसंख्य केरळ, आंध्रचे व्यावसायिक आहेत; परंतु त्यातही मालवणच्या नितीन तायशेटेंची विजया बेकरी, देवगडच्या संजय धुरीची बेकरी यांनी आपले वेगळेपण जपलेली आहेतच. राजापूरच्या ठाकूरांची बेकरी आणि त्यांची उत्पादने मोठ्या शहरांतूनही जातात. कोकणातील हॉटेल व्यवसायात काही वेगळेपण जपून असणारे कोकणातील व्यावसायिक आहेतच; परंतु कोकणातील व्यावसायिकांनी नेहमीच सावध असायला पाहिजे. अधिकाधिक ग्राहकांशी आपण जोडले गेलो पाहिजे. ग्राहकांशी असलेलं नातं अधिक घट्ट कसं असेल हे पाहिलं पाहिजे. कोकणातील बाजारपेठांमध्ये कोकणातीलच व्यापारी असावा. व्यापार करताना दिसावा एवढीच अपेक्षा आहे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -