Sunday, November 2, 2025
Happy Diwali

कोकणातली पोरं महाराष्ट्रात घालतायत 'बारस'...

कोकणातली पोरं महाराष्ट्रात घालतायत 'बारस'...

शनिवारी चिपळूणमध्ये रंगणार बारसचा प्रयोग

रत्नागिरी : सध्या 'बारस' (Baras) हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर (Experimental Theatre) चांगलंच गाजत आहे. नाटकासोबत असलेली नाळ तुटू नये म्हणून कोकणातील (Konkan) मुलांनी मुंबईत नोकर्‍या सांभाळत 'कलांश' थिएटर (Kalansh Theatre) ची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत अनेक शॉर्टफिल्म, युट्यूब व्हिडिओ, एकांकिका सादर झाल्या. त्यातलीच महाराष्ट्रभर गाजलेली एकांकिका म्हणजे 'बारस'.

माणूस मेल्यावर त्याच्या बाराव्याला कोकणात बारस घातली जाते. ही कोकणातील एक प्रथा असून यावर नाटकरुपी काहीतरी होऊ शकतं ही मूळ संकल्पना महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांना सुचली. सुरुवातीला या संकल्पनेवर युथ फेस्टिव्हलमध्ये (Youth festival) एक प्रहसन सादर झालं ज्याने राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला. त्याचं लिखाण श्रमेश बेटकर या महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेत्याने केलं होतं. नंतर याच संकल्पनेवर आधारित एकांकिका प्रतीक चौधरी व अनिकेत शिगवण यांनी लिहिली व अभिजित मोहिते याने दिग्दर्शन केले. अनेक स्पर्धांतून या एकांकिकेने पारितोषिके पटकावली. त्यामुळेच परीक्षक व प्रेक्षकांकडून एकांकिकेचं दोन अंकी नाटक व्हावं असं वारंवार सुचवण्यात आलं.

२२ एप्रिल २०२३ रोजी 'बारस' या दोन अंकी प्रायोगिक नाटकाचा पहिला प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर, दादर येथे पार पडला. या नाटकाचे आतापर्यंत महाराष्ट्रात सात प्रयोग पार पडले असून त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याचा पुढील प्रयोग शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संध्याकाळी ६:०० वाजता रंगणार आहे. यापुढेही या नाटकाचे कोकण आणि पुण्यात प्रयोग रंगणार आहेत. पुढील प्रयोगांच्या तारखांसाठी तुम्ही 'कलांश थिएटर' (@kalansh_theatre) या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजला भेट देऊ शकता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >