Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGondavalekar Maharaj : अभिमान जाणे ही देवाची कृपाच

Gondavalekar Maharaj : अभिमान जाणे ही देवाची कृपाच

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

आता उत्सव पुरा झाला. आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा; आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे, तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी – अभिमान इथे सोडावा आणि त्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही.

एकदा, एकजण ३ वर्षांपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरू तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की, “तू इथे काय करतो आहेस?” तर तो म्हणाला, “मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधना करतो आहे.” ते म्हणाले, “वा! वा! फार चांगले! तू आणखी तीनच दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल.” तो तसे करू लागला. त्याला वाटले की, ३ वर्षे साधन केले, तर आता ३ दिवस करणे फारसे काय अवघड आहे, ते तर सहज करीन! पण गंमत अशी की, त्याला गुरूने सांगितल्यावर तिथे ५ मिनिटेसुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे, असे वाटू लागले आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली, तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली. तो गुरूला शरण गेला. तो म्हणाला, “मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले म्हणून माझ्याकडून हे साधन झाले.” याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून सात्त्विक अभिमानही उपयोगी नाही. एकवेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जातो. पण सात्त्विक अभिमान सुटायला वेळ लागतो. परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच फार कठीण जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -