
- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
बाळाभाऊंनी महाराजांना प्रश्न केला, “वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा आणि तुमचा मार्ग वेगवेगळा असताना आपण दोघे एकमेकांना भाऊ कसे म्हणता? ते आपले बंधू कसे?” याला उत्तर देण्याकरिता महाराजांनी त्यांना म्हटले, “बाळा हा छान प्रश्न केलास तू आम्हाला.”
महाराजांनी पुढे बाळाभाऊंच्या प्रश्नाचे अत्यंत विस्ताराने जे निरसन केले आहे, त्याद्वारे सामान्य जनांना योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग या तिन्ही मार्गांचे मर्म विषद करून सांगितले आहे. महाराज म्हणतात, “ईश्वरासन्निध जावयाचे तीन मार्ग जरी वरवर पाहता भिन्न भिन्न दिसत असल्यामुळे पाहणाऱ्याचे मन जरी घोटाळून जात असले तरी हे तिन्ही मार्ग ज्ञानाच्या गावी जाऊन मिळतात.”
कर्म मार्गाबद्दल अत्यंत सोप्या शब्दांत माहिती सांगताना महाराज म्हणतात, “सोवळे, ओवळे, संध्या स्नान, व्रत वैकल्ये, उपास आणि अनुष्ठाने ही सर्व कर्माची अंगे होत. हे सर्व निरालसपणे (आळस न करता, नियमित) करणे म्हणजेच कर्ममार्ग अनुसरणे आहे, यात काही अधिक न्यून झाल्यास कर्म मार्गाचे फळ मिळत नाही. तसेच हे सर्व करीत असताना इतरांना दुरुत्तरे करून वक्ताडन करू नये.”
भक्तिमार्गाचे रहस्य सांगताना महाराज म्हणतात, “भक्ती मार्गाने जाणाऱ्यांचे मन (अंतःकरण) अतिशय शुद्ध असले पाहिजे. मनामध्ये थोडी जरी मलिनता असली, तर भक्तिरहस्य त्या साधकाचे हाती येणार नाही. भक्ती मार्गाने जाणाऱ्या साधकाच्या अंगी दया, प्रेम, लीनता असावी तसेच भजन, पूजन, श्रवण यामध्ये त्याची आस्था असली पाहिजे. यासोबतच साधकाच्या मुखी आराध्यदैवताचे नामस्मरण नित्य असावे. अशी सर्व अंगे ही भक्ती मार्गाची आहेत. या अंगाचे अनुसरण करून जो साधक भक्ती करतो त्याला श्रीहरीची भेट निश्चितच होते. भक्ती मार्गाचा जो विधी आहे तो सोपा आहे. पण त्याचे आचरण करणे हे कर्ममार्गापेक्षा देखील कठीण आहे. ज्याप्रमाणे खालून आकाशाकडे बघताना ते खूप जवळ आहे, असा आभास निर्माण होतो त्याचप्रमाणे हे आहे.”
त्यानंतर महाराजांनी बाळाभाऊंना योग मार्गाची माहिती येणेप्रमाणे सांगितली :
महाराज म्हणतात, “योग मार्ग हा तौलनिकदृष्ट्या थोडा कठीण आहे. याचा पसारा (आवाका) खूप मोठा आहे. पण असे जरी असले तरी या मार्गात ज्याचा पसारा त्याच्यापाशीच असतो. योगमार्ग साधण्याकरिता बाहेरचे काही लागत नाही. जेवढे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व पिंडात असतेच आणि हे पिंडातील साहित्य घेऊनच योग साधता येतो.”
योग मार्गाचे अनुसरण करताना काय काय करावे लागते, याची माहिती महाराजांनी बाळाभाऊंना सांगितली.
“योगसाधनेमध्ये आसने, प्राणायाम, रेचक, कुंभक, धौती योग, मुद्रा, त्राटक हे प्रकार जाणून घेतले पाहिजेत. योगी जनांना याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इडा, पिंगला आणि सुशुम्न या तिन्ही नाडीमधील भेद (फरक आणि रहस्य) कळले पाहिजेत.”
पुढे महाराज बाळाभाऊंना रहस्यभेद करून सांगतात, “साधकाने तिन्ही मार्गांपैकी कोणताही मार्ग जरी पत्करला तरी या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान हेच आहे आणि हे जे ज्ञान प्राप्त होईल, ते प्रेमावीण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमावीण केले जाते, ते व्यर्थ होय. प्रत्येकाची शरीरे आणि त्यांची रूपे जरी वेगवेगळी असली तरी आत्म तत्त्व हे एकच आहे. रंग आणि रूपाचा कोणताही प्रभाव आत्म्यावर पडत नाही. त्याचप्रमाणे या तिन्ही मार्गांचे आहे. त्यांची बाह्य रूपे वेगवेगळी असली तरी मूळ कारण हे एकच आहे. ज्यावेळी कोणी एक साधक यापैकी एखाद्या मार्गाचा अवलंब करतो, त्या वेळेपर्यंत त्याला त्या त्या मार्गाचे महत्त्व वाटते. मुक्कामास (ध्येय विषयापर्यंत) पोहोचल्यावर मात्र मार्गाचा विचारच उरत नाही. पथ चालण्याचा आरंभ केला; परंतु मुक्कामास नाही पोहोचला, अशी स्थिती असणाऱ्या साधकांची पंथाभिमानामुळे वादविवाद, भांडणे होतात. या तिन्ही मार्गाचे पांथ (पथीक, साधक, तपस्वी) ज्यावेळी मुक्कामास पोहोचतात (त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते, इप्सित साध्य होते) त्यावेळी ते संत होतात, त्यावेळी मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही द्वैत असतं नाही.
इतके सर्व सांगितल्यावर महाराजांनी निरनिराळ्या संतांचे नावासह दाखले देऊन त्यांनी कोणता मार्ग अनुसरला हे देखील बाळाभाऊंना सांगितले. श्री महाराजांनी एवढे अगाध ज्ञान बाळाभाऊंना फोड करून सांगितले ते दासगणू महराजांनी ओवीबद्ध करून हा ज्ञानाचा ठेवा सामान्यजनांना उपलब्ध करून दिला ही आपणा सर्वांसाठी फार फार मोठी उपलब्धी आहे.
तद्नंतर महाराज बाळाभाऊंना बोलले, “आता पुढे काही विचारू नकोस. हे जे काही मी तुला सांगितले हे कोणाला सांगू नकोस. मला पिष्याचे रूप घेऊन निवांत बसू दे. ज्याची निष्ठा असेल, किंवा जो माझा असेल त्याचे कार्य मी करत राहीन.” महाराज असे का बोलले ते देखील महाराजांनीच सांगितले. खालील ओवीचे अवलोकन, मनन आणि चिंतन केले असता ते लगेच कळून येईल :
ज्यासी अनुताप झाला।
ब्रह्मज्ञान सांगणे त्याला।
उगीच तर्कटी वात्रटाला
त्याचा स्फोट करू नये ॥१२८॥
कोणी काही म्हणोत।
आपण असावे निवांत।
तरीच भेटे जगन्नाथ।
जगद्गुरू जगदात्मा॥१२९॥
एवढा उपदेश महाराजांचे मुखारविंदातून ऐकल्यानंतर बाळाभाऊंच्या नेत्रांतून प्रेमाश्रू ओघळू लागले. त्या प्रसंगाचे भावपूर्ण वर्णन संत दासगणू महाराज करतात,
ऐसा उपदेश ऐकिला।
बाळाभाऊंच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला।
पूर तो न आवरे त्या॥ १३०॥
अष्टभाव दाटले। शरीरा रोमांच उमटले।
वैखरीचे संपले। काम तेणे सहजची॥१३१॥
क्रमशः