Dnyaneshwari : ‘अशी ही सुंदर ज्ञानयात्रा’


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


भगवद्गीतेतील सारी मनातील अवस्था, चित्र आहेत, ती वर्णन करायला कठीण, कारण ती सूक्ष्म आहेत; परंतु ज्ञानदेव त्यांच्या अफाट प्रतिभेने व प्रतिमेने हे आंतरिक जग असं साकारतात आणि ते सारं काही सोपं, सहज व सुंदर करतात. या ज्ञान व आत्मज्ञानाच्या सुंदर यात्रेचे आपल्यावर कळत-नकळत संस्कार होतात.



भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे एक प्रवास, एक यात्रा आहे. यात अर्जुन हा जणू यात्रेकरू होय. ही यात्रा कसली? तर ज्ञानाची, आत्मज्ञानाची!



माऊलींनी ज्ञानेश्वरीत या यात्रेची जणू सुंदर चित्रं, टप्पे रेखाटले आहेत. अर्जुनाचा प्रवास ‘मी म्हणजे हा देह’ इथून सुरू होतो. पुढे त्याचं मी-तू पण नाहीसं होतं! साऱ्या सृष्टीत भरून राहिलेलं एक चैतन्य, तत्त्व त्याला उमगतं. भगवान श्रीकृष्णांच्या या शिकवणुकीचं सार म्हणजे अठरावा अध्याय होय.
यात ज्ञानदेव ज्ञानी पुरुषाची लक्षणं रेखाटतात. ती सुंदर दाखल्यांनी सरूप करतात. आत्मज्ञान झालेला माणूस कसा असतो? शांत, प्रसन्न असा! ही स्थिती त्याला एकदम प्राप्त होत नाही. त्यासाठी तो श्रम करतो आणि मग या पदाला पोहोचतो. त्याच्या अवस्थेचं वर्णन करणारे हे अप्रतिम दृष्टान्त तर पाहा...



“अर्जुना, आत्मज्ञान मिळवण्यासाठी केलेल्या श्रमांचा जसा परिहार होतो (ओवी क्र. १०९४)


जेथे श्रमांची आठवण राहात नाही, त्या स्थितीला ‘आत्मज्ञानाची प्रसन्नता” असे म्हणतात. ती स्थिती तो योग्य झालेला पुरुष भोगतो...” (ओवी क्र. १०९५)



हा विचार स्पष्ट करण्यासाठी आलेला पहिला दाखला अगदी रोजच्या जगण्यातील, जेवणाचा!
“ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो, त्या अग्नीची त्या पदार्थांमधील उष्णता नाहीशी होते, तेव्हाच जसे ते अन्न समाधानकारक होते.” (ओवी क्र. १०९२)



पुढे येतो दाखला - किंवा शरदऋतू लागला म्हणजे वर्षाकाळात दररोज येणारी भरती आणि ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांग (मृदंग, तंबोरा) बंद होऊन मागे केवळ वाहवा मात्र उरते. ती ओवी अशी -
ना ना भरतिया लगबगा। शरत्काळीं सांडिजे गंगा।
कां गीत राहतां उपांगा। वोहटु पडे॥ (ओवी क्र. १०९३)
किती सरस उदाहरणं आहेत ही!



अग्नी असेल, तरच स्वयंपाक होऊ शकतो. मात्र त्यातील कढतपणा नाहीसा झाल्यावर त्या अन्नाचा आस्वाद घेता येतो. त्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीसाठी खूप कष्ट करावे लागतात. हे कष्ट अग्नीप्रमाणे दाहक असतात. मग ते श्रम संपतात, ती आठवण नाहीशी होते, तेव्हा मनाला शांती, प्रसन्नता लाभते.



इथे स्वयंपाकाच्या साध्या उदाहरणातून माऊली काय करतात? तर, ज्ञानप्राप्तीसाठीचे अपार श्रम आणि नंतर मिळणारं समाधान सहजपणे समजावून देतात.



दुसरा दृष्टान्त परमपवित्र गंगा नदीचा! वर्षाकाळात गंगेला भरती येते, तर शरदऋतूत ती स्थिर होते, त्याप्रमाणे साधकाच्या मनातही सुरुवातीला भरती-ओहोटीप्रमाणे चलबिचल असते; परंतु आत्मज्ञान झालं की, त्याचं मन स्थिर होतं.



साधकाच्या मनातील चलबिचल ते स्थिरता हा प्रवास! तो वर्षाकाळ व शरदऋतू या उपमेतून किती छान उलगडतो! त्यानंतर येणारा दाखला सुरेल अशा गाण्याच्या समारंभाचा! साधकाची साधना जणू गाण्याच्या मैफलीसारखी, त्यात सुरेल संगीत भरलेलं! मैफल संपते, शेवटी केवळ ‘वाहवा’ उरते त्याप्रमाणे साधकाला सर्वोच्च ज्ञान होतं, मग बाहेरील करावयाच्या गोष्टी थांबतात. आत एक सुंदर ‘वाहवा’ ऐकू येते. त्याचं मन सुंदर, शिव झालेलं असतं. याचं चित्र या दाखल्यातून रंगवलं आहे.



माऊलींचं मोठेपण यात आहे की, ही सारी मनातील चित्र, अवस्था आहेत, ती वर्णन करायला कठीण, कारण ती सूक्ष्म आहेत; परंतु ज्ञानदेवांची प्रतिभा अफाट! त्या प्रतिभेने व प्रतिमेने ते हे आंतरिक जग असं साकारतात! ते सारं काही सोपं, सहज व सुंदर करतात. त्याचे आपल्यावर कळत नकळत संस्कार होतात. आपल्यातील ‘दीप’ही उजळून निघतात. अशी ही आपली ज्ञानयात्रा… साऱ्या समस्यांवरची
अचूक मात्रा!



manisharaorane196@gmailcom

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा