मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या विश्वचषक २०२३च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या जबरदस्त ७ विकेटच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला हरवत फायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे.
शमी आला धावून
विश्वचषकाच्या या सामन्यात मोहम्मद शमी पुन्हा एकदा धावून आला. मोहम्मद शमीने घेतलेल्या सात विकेटच्या जोरावर भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय साकारता आला. त्याने ५७ धावांत ७ विकेट घेतल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर त्याने भारताला विजय मिळवून दिला.
श्रेयसचे झुंजार शतक
या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तुफानी फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. अय्यरने ७० बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली.
कोहलीच्या शतकांचे अर्धशतक
विराट कोहलीने या सामन्यात एकदिवसीय शतकांचे अर्धशतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढला. कोहलीने या सामन्यात ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. त्याने या सामन्यात इतिहास रचला.