मराठा आरक्षणासाठी सर्व पुरोगामी चळवळी सोबत - सुनील मालुसरे
नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या ६५ दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला बळीराजा रॅलीतील सर्व पुरोगामी चळवळींनी पाठिंबा देण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी उपोषणकर्ते राम खुर्दळ यांना भेटून सर्वच पुरोगामी डाव्या चळवळी मराठा आरक्षणाच्या लढ्यात कायम सोबत आहोत असा शब्द यावेळी कॉम्रेड सुनील मालुसरे यांनी दिला.
दि. १४ नोव्हेंबर बलिप्रतिप्रदेचे औचित्य साधून नाशिकला बळीराजा रॅली काढण्यात आली. या रॅलीत असलेल्या सहभागींनी 'ईडा पीडा टळो बळीचे राज्य येवो' अशा घोषणा देत शिवतीर्थावर मराठा आरक्षण साखळी उपोषणात येवून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला. यावेळी दिलीप लिंगायत व उपोषणकर्ते राम खुर्दळ यांच्या हातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. तसेच सकल मराठा समाजाचे प्रफुल्ल वाघ यांनी गरजवंत मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेतून मराठा आरक्षणाचा शिक्षण व रोजगाराचा लढा सुरू आहे, समाजातील सर्वच घटक मराठा समाजासोबत आहे असे सांगितले.
यावेळी दिलीप लिंगायत, कॉम्रेड सुनील मालुसरे, ऍड राहुल तुपलोंढे, ऍड रविंद्र चंद्रमोरे, अविनाश आहेर, उपोषणकर्ते सकल मराठा समाजाचे प्रवक्ते राम खुर्दळ, ऍड कैलास खांडबहाले, प्रफुल्ल वाघ, शरद लभडे, शेतकरी संघटनेचे भानुदास ढिकले, अर्जुन बोराडे, सोपान कडलंग, निलेश ठुबे, विकी गायधनी, योगेश कापसे, गायरान आंदोलनातील सुभाष मुंढे, जगदीश शेजवळ, सचिन पवार, नितीन खैरनार, सागर वाबळे, गणेश पाटील उपस्थित होते.






