एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
सिडको : पूर्व वैमनस्यातून फटाके फोडतांना झालेल्या वादानंतर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मित्रांनीच पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे . ऐन दिवाळी सणात खून झाल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) असे मयताचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले की. पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्याच्या व परिसरात राहणा-या मित्रांनी कोयत्याने त्याच्या शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मयत गौरव याची पत्नी सपना आखाडे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून काहीना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनार करीत आहेत.