विजयेंद्र यांची कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती
बंगळुरू : माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने भाजपने येडियुरप्पा यांचे हात बळकट करून आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएससोबत युती करून भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लिंगायत आणि वोक्किलाग या दोन प्रमुख समुदायांच्या मतांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
दक्षिण भारतात प्रथमच भाजपला सत्तेवर आणण्यात येडियुरप्पा यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना मुख्यमंत्रीपद भेट म्हणून देण्यात आले. २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीएस युतीचे सरकार पडल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले. पण केंद्रीय नेतृत्वाशी झालेल्या समजुतीमुळे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगण्यात आले. पण हे लिंगायत समाजाला पटले नाही आणि पक्षाने येडियुरप्पा यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले. यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आणि सत्ता गमवावी लागली. येडियुरप्पा यांच्या नाराजीचा पक्षावर परिणाम होऊन जनमत विरोधात गेल्याचे भाजपच्या अंतर्गत पाहणीत दिसून आले.
कर्नाटकात लिंगायत समाजाची मते नेहमीच भाजपच्या पाठीशी उभी राहिल्याने निर्णायक ठरतात, परंतु गेल्या मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लिंगायतबहुल उत्तर कर्नाटकातील बेळगावी, धारवाड, हुब्बल्ली, विजयपुरा आणि गदगमध्ये अनपेक्षितपणे हादरा दिला.
राज्यातील ७० विधानसभेच्या जागांवर लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे आणि काँग्रेसने त्यापैकी ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे लिंगायत समाजाच्या अलिप्ततेचा आगामी लोकसभा निवडणुकीतही विपरीत परिणाम होण्याची भीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत होती.
यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५ जागा जिंकणाऱ्या भाजपने आता लिंगायत समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी येडियुरप्पा कुटुंबाला महत्त्व दिले आहे. यामुळे विजयेंद्र यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी, सर्व सत्ता येडियुरप्पा यांच्या हाती राहणार असल्याचे समजते.