Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यCoastal Road : कोस्टल रोडची सफर रखडणे मुंबईकरांना पडणार महागात...

Coastal Road : कोस्टल रोडची सफर रखडणे मुंबईकरांना पडणार महागात…

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता गेल्या आठवड्यात मुंबईतील समुद्री मार्गाच्या (कोस्टल रोड) कामास काही बंधने घालण्यात आली आहेत. मात्र ही योग्य बाब नसून शहरातील वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या तसेच मुंबई शहर व दोन्ही उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा कोस्टल रोड आता मे २०२४ मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीपासून तूर्तास तरी मुक्तता मिळणार नसल्याचे चित्र आहे. आधीच हा कोस्टल रोड बराच रखडला आहे व अडथळ्यांची मालिका सुरू आहे. सध्या कोस्टल रोडचे समुद्र किनाऱ्यावरील काम सुरु असून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला तर साहित्य घेऊन येणारी वाहने येण्यात अडचण निर्माण होईल आणि वेळोवेळी वाहतूक थांबवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येण्याचे स्वप्न भंगले असून आता तर या कामावरच प्रदूषण नियमावलीनुसार बंधने घातली असून मे २०२४ मध्येच मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड येईल, असे दिसत आहे.

प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी फायदेशीर, पर्यावरणस्नेही ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून काम सुरू झालेल्या प्रकल्पाचे सद्यस्थितीत एकूण ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गात एकूण १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून पहिल्या बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ ला पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोड नोव्हेंबरपर्यंत एक मार्गिका सुरू करून प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र समुद्रकिनारी काम शिल्लक असल्याने मटेरियल आणणारे ट्रक, गाड्या येण्यास अडचण होईल आणि रस्ते वाहतूक वेळोवेळी थांबवणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे २०२४ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिकेकडून आता सांगण्यात येत आहे. हा कोस्टल रोड बांधताना पालकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागले. प्रदूषण नियामक मंडळाकडून हरकती तसेच मोठा निधी उभारताना पालिकेला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, डिसेंबर अखेरपर्यंत सुरु करण्यात येणारी एक मार्गिका फेब्रुवारीपर्यंत सेवेत आणण्याची चाचपणी सुरु आहे. तांत्रिक बदल, डिझाईनमध्ये बदल यामुळे कोस्टल रोड प्रकल्प सल्लागाराच्या कामांत बरीच वाढ झाली आहे. सल्लागाराच्या कामांत वाढ झाल्याने खर्चात वाढ होऊन ३५ कोटींचा सल्ला ८५ कोटींवर गेला आहे. २०१७ ते २०२३ या सहा वर्षांत तब्बल ५१ कोटी रुपयांनी हे शुल्क वाढले आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कोस्टल रोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला. कोस्टल रोड प्रकल्प मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मरिन ड्राईव्ह ते वरळी या सुमारे १० किमी अंतराचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के प्रकल्प पूर्ण झाला असून डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन होते. मात्र हे नियोजन आता फसणार आहे. या प्रकल्पासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी-एचडीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपन्यांना कामे देण्यात आली असून मे. एईकॉम एशिया कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ जानेवारी २०१७ पासून सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यावेळेस ३४ कोटी ९२ लाख रुपये होते. मात्र गेल्या सहा वर्षांत प्रकल्पाच्या कामात काही वेळा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून वरळी येथील समुद्रात मच्छीमारांच्या बोटींच्या प्रवेश मार्गाचा वाद संपुष्टात आणत दोन स्तंभामधील अंतर ६० मीटरऐवजी १२० मीटर केले. त्यामुळे प्रकल्पात काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.

कोस्टल रोड प्रकल्पात दोन पिलरमधील अंतर १२० मीटर करणे हे अतिरिक्त काम आहे. या कामातील बदलाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांचा गट नेमून सल्लागाराला काम करावे लागले आहे. या तज्ज्ञांमध्ये संरचना तज्ज्ञ, सुरक्षा तज्ज्ञ यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ विशेष कामांसाठी ओळखले जात असून त्यांचा परदेशातील कामांचा अनुभव आहे. हे तज्ज्ञ वेळोवेळी कामाला भेट देणार आहेत. या बदलामुळे सल्लागाराने ८ कोटी ५ लाख रुपये इतके वाढीव शुल्क प्रस्ताविले होते. सल्लागाराशी केलेल्या वाटीघाटीनंतर ७ कोटी २१ लाख रुपये शुल्क देण्याची शिफारस करण्यात आली आहे. शुल्क वाढीच्या या प्रस्तावाला पालिका प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात फेज वन अंतर्गत हाजी अली ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान फेज वनचे काम सुरु आहे. मात्र ‘फेज वन’ची मुदत सप्टेंबर २०२३ ला संपली व कंत्राटदाराला मुदतवाढ मिळाली. हाजी आली ते प्रियदर्शनी पार्क काम लांबणी आता कुठे पूर्ण झाले आहे. दरम्यान, फेज टू व फेज चारच्या कंत्राटाची मुदत डिसेंबरला संपणार आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाच्या कंत्राटास मुदतवाढ दिल्याने पुन्हा सल्लागाराच्या खर्चात १५ कोटींनी वाढ होणार असून प्रकल्प खर्चात वाढ होणार असल्याने कोस्टल रोड प्रकल्प हा चांगलाच महागला आहे. डिसेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणे कठीणच आहे. कोस्टल रोड डिसेंबर अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन केले गेले होते. मात्र कोस्टल रोड प्रकल्पात अंतर्गत कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे आता तरी शक्य नाही. तसेच फुटपाथच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात येत आहे. अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरु असली तरी ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे कठीणच आहे. त्यामुळे कोस्टल रोड सेवेत येण्याची आणखी काही महिने वाटच पाहावी लागणार आहे.

जनलॅड स्कॅपिंगच्या धर्तीवर फुटपाथचा कायापालट!
कोस्टल रोड प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह इत्यादी समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या समुद्र बाजूला असलेल्या फुटपाथवर बसण्यासाठी सिटिंग व्यवस्था, टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. मात्र आता डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर वरळी सी फेस समुद्र दिशेला २०० परिसरात लॅडस्कॅपिंगच्या धर्तीवर फुटपाथचा कायापालट करण्यात येत आहे. समुद्र बाजूला बसून अथांग समुद्र न्याहाळता येणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर समुद्र किनाऱ्याजवळील ७.३० किलोमीटरच्या फुटपाथच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास कंत्राटदारास सांगण्यात आले आहे. त्यात आता वायू प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोस्टल रोडच्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमध्ये प्रतिबंधक उपाययोजना न केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. कोस्टल रोडचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यासाठी आरएमएस प्लांट असून त्या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना न ठेवल्याबद्दल पालिकेने नोटीस बजावली आहे. या प्रकल्पात तीन ठिकाणी आरएमसी प्लांट आहेत. त्यांना ठिकाणी धूळ प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वानुसार झाकण्यात न आल्याने पालिकेने सूचना पत्र पाठवले आहे. आता नवीन उपाययोजनेनुसार वरळी सी फेस या टप्प्यात सुरू असलेल्या कामातून धूळ प्रदूषण रोखण्यासाठी सूक्ष्म पाणी फवारणी केली जात आहे. या ठिकाणी प्रदूषण होत असल्याचे आढळल्यास दहा ते पंधरा मिनिटे पाणी फवारणी केली जात आहे. जमिनीवरून दहा ते पंधरा मीटर उंचीवरून पाण्याची फवारणी होत असल्याने प्रदूषण नियंत्रणात येत आहे. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ हवेत उडू नये यासाठी हिरवे पडदे लावण्यात आलेले आहेत. अशा उपयोजना करूनही जर यापुढे प्रदूषण होत राहिल्यास हा प्रकल्प थांबवण्याच्या सूचनाही पालिकेने केल्या आहेत. आधीच होत असलेला व वाढलेला खर्च त्यात आहे. नवीन संकट पाहता ‘कोस्टल रोड’च्या नशिबात अडचणीच अडचणी निर्माण होत आहेत. मुंबईला वाहतूक कोंडीमुक्त व प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तो आणखी रखडणे मुंबईकरांच्या भल्याचे नाही. शेवटी जितका तो रखडत जाणार तितका आर्थिक भुर्दंड पालिकेला बसेल, बसणार आहे हे तितकेच खरे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -